मुंबई - मुंबई महापालिकेच्या नायर दंत रुग्णालयात फॉरेन्सिक ऑडोन्टोलॉजी विभाग सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे . या विभागाच्या माध्यमातून फॉरेन्सिक सायन्सचा भाग असलेला ऑडोन्टोलॉजी हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. पालिका सभागृहात प्रस्तावाला मंजुरी मिळाल्या नंतर हा विभाग सुरू केला जाणार आहे.
गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना दातांच्या खुणांची मदत होते. या संबंधितांच्या तज्ज्ञाला फॉरेन्सिक ऑडॉन्टोलॉजिस्ट असे म्हटले जाते. अनेक घटनांमध्ये पोलिसांना आरोपींना अटक करण्यासाठी आणि आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडोन्टोलॉजी या विज्ञानाची मदत झाली आहे. यासाठी फॉरेन्सिक ऑडॉन्टोलॉजी विभाग असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नायर दंत रुग्णालयात फॉरेन्सिक ऑडॉन्टोलॉजी हा विभाग सुरू करण्यासंबंधी प्रशासनाने विचार सुरू केला आहे.
अशा विभागात तज्ज्ञांची कमतरता आहे. तसेच या विभागाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही मोजक्या आहेत. महाराष्ट्रात फॉरेन्सिक ऑडॉन्टोलॉजी या विषयाचा प्रसार व्हावा यासाठी नायर दंत रुग्णालयात हा विभाग सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार केला जातो आहे. या विभागासाठी लागणारी जागा, साधन-सामुग्री याबाबत सध्या विचार सुरू आहे. मुंबई महापालिका सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर हा विभाग सुरू करण्यात येईल. यानंतर फॉरेन्सिक ऑडॉन्टोलॉजीचा एक वर्षाचा कोर्सही सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.