मुंबई - ग्रीहा या संस्थेच्या मदतीने पर्यावरणपूरक इमारती निर्माण करण्यावर शासन भर देणार आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ग्रीहाच्या वतीने मुंबईत आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला टेरी या संस्थेचे अध्यक्ष डॉ अजय माथूर, ग्रीहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठ व्यासपीठावर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व इमारती पर्यावरणपूरक करण्यावर राज्य सरकारचा भर आहे. त्यासाठी शासनाने स्पर्श हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमांतर्गत शासनाच्या सर्व इमारती हरित इमारती करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत भारत सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाशी संलग्न ग्रीहा या संस्थेशी हरित इमारतीचे मानांकन करून घेण्याचा करार मे २०१८ मध्ये करण्यात आला. या करारामुळे शासनाच्या ज्या इमारती पर्यावरणपूरक झाल्या आहेत, त्यांचे ऑडिट करून त्यांना प्रमाणित करण्यात येणार आहे. भविष्यात खाजगी क्षेत्रातील इमारतीसुद्धा पर्यावरण पूरक होतील असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी स्वाती चोक्सी, जयेश वीरा, अनघा परांजपे, संदीप पाटील, यांना मंत्री पाटील यांच्या हस्ते ‘ग्रीहा राईझिंग स्टार ॲवॉर्ड’ ने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अजय माथूर यांनी केले. तर आभार प्रदर्शन ग्रीहाच्या शबनम बस्सी यांनी केले. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते आणि बांधकाम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.