मुंबई - मुंबई महापालिका प्रशासनाने जल आकारात 3.72 टक्के इतकी वाढ सुचवली आहे. स्थायी समितीत या दरवाढीला बहुमताने मंजुरी दिल्याने ही दरवाढ 16 जून पासून लागू केली जाणार आहे. यामुळे आधीच महागाईत त्रस्त असलेल्या मुंबईकरांना आणखी महागाईचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाचा आस्थापना खर्च, परिरक्षण खर्च, शासकीय धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी याच्यात वाढ झाल्याने पाणी करात दरवर्षी 8 टक्के पर्यंत वाढ करण्यास स्थायी समितीने 2012 मध्ये मंजुरी दिली होती. त्यानुसार निवडणुकीची वर्ष सोडल्यास दरवर्षी पाणी करात वाढ केली जात आहे. त्यानुसार पालिकेच्या जल विभागाने सन 2018-19 या वर्षासाठी पाणी करात 3.72 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी 14 पैसे तर एअरटेड पाण्याच्या उत्पादन, शीतपेय बनवणाऱ्या कंपन्या, बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यासाठी 3 रुपये 81 पैसे इतकी वाढ प्रस्तावित केली आहे. प्रशासनाने स्थायी समितीत पाणी दरवाढीबाबतचे निवेदन केले असता त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने विरोध केला मात्र शिवसेना आणि भाजपाने बहुमताच्या जोरावर पाणी दरवाढ मंजूर केली. पालिकेने सुचवलेली दरवाढ 16 जूनपासून लागू केली जाणार आहे. 2018 -19 मधील साडे नऊ महिन्यात 41. 33 कोटी रुपये इतका महसूल पालिकेला मिळेल अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. पाणी करात वाढ झाल्याने मुंबईकरांच्या त्रासात आणखी भर पडणार आहे.
पाण्याची दरवाढ
(दर प्रति हजार लिटर )
निवासी प्रकार जुने दर (रुपये) नवे दर (रुपये)
घरगुती ग्राहक 3.68 3.82
झोपडपट्टया व आदिवासी पाडे 4.08 4.23
इतर घरगुती ग्राहक - 4.91 5.09
बिगर व्यावसायिक संस्था - 19.67 20.40
व्यावसायिक संस्था 36.88 38.25
उद्योग, कारखाने इ. 49.16 50.99
रेसकोर्स, तारांकीत हॉटेल्स - 73.75 76.49
शितपेये,बाटलीबंद पाणी उत्पादक 102.44 106.25