मुंबई - पावसाळ्याच्या मध्यावर (Mid Monsoon) डेंगी, हिवतापाचे (मलेरिया) रुग्ण वाढतात, असा गेल्या काही वर्षांचा अनुभव. धारावी परिसरातही याच काळात डेंगी, हिवताप या रोगांचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आल्याचाही अनुभव. हाच अनुभव लक्षात घेऊन महापालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याने धारावी परिसरातील डास उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासाठी 'कोंबिंग ऑपरेशन' सुरू केले आहे. यासाठी ५२ कर्मचा-यांची पलटण तैनात करण्यात आली आहे.धुम्र फवारणी यंत्र, औषध फवारणी यंत्र यासारख्या आयुधांसह सुसज्ज असणा-या या पलटणीद्वारे डास उत्पत्तीस्थळांचा नायनाट करण्यात येत आहे. २५ जुलै ते ३ ऑगस्ट या दरम्यान करण्यात येणा-या 'कोंबिंग ऑपरेशन'च्या पहिल्याच दिवशी ३ हजार ५८४ संभाव्य डास उत्पत्तीस्थळे तपासण्यात आली. यापैकी ६६ ठिकाणी डेंगी वा हिवताप पसरविणा-या डासांची उत्पत्ती आढळून आली आहे, अशी माहिती महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.
या 'कोंबिंग ऑपरेशन' बाबत अधिक माहिती देताना नारिंग्रेकर यांनी सांगीतले की, जुलै महिना संपत आला आणि पावसाने थोडी विश्रांती घेतली की, अनेक ठिकाणी पावसाच्या साचलेल्या पाण्यात डास अंडी घालतात.डासांना अंडी घालण्यासाठी साचलेले चमचाभर पाणीही पुरेसे असते. मग ते पाणी कधी उघड्यावर पडलेल्या एखाद्या बाटलीच्या झाकणात साचलेले असते, तर कधी नारळाच्या करवंटीत साचलेले असते. टायर, थर्माकोल,अडगळीच्या वस्तू, झाडांच्या कुडयांखालील ताटल्या, फ्रीजचा डिफ्रॉस्ट ट्रे, ए.सी., रिकामी शहाळी, ताडपत्री, पन्हाळी यासारख्या विविध वस्तूंमध्ये जमा झालेल्या काही थेंब पाण्यातही डास अंडी घालतात आणि आपला कुटुंब-कबिला वाढवितात. हेच डास डेंगी (Dengue), हिवताप (Maleria) यासारख्या घातक रोगांच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतात. त्याचमुळे पाणी साचू शकेल, अशा वस्तू सातत्याने हटविणे व त्यात साचलेले पाणी नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रभावी डास नियंत्रण साध्य करण्यासाठी महापालिका आपल्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये सातत्याने सर्वस्तरीय कार्यवाही करत असते. तथापि, महापालिकेच्या 'जी उत्तर' विभागातील धारावी हा डास नियंत्रणाच्या दृष्टीने आव्हानात्मक परिसर. याच परिसरात पावसाळ्याच्या मध्यावर डेंगी, हिवतापाचा प्रादुर्भावही इतर परिसरांच्या तुलनेत अधिक आढळून येत असल्याचा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. डास नियंत्रणासाठी महापालिकेच्या कर्मचा-यांना घराजवळील परिसर आणि अनेकदा घरातील कानाकोपरा तपासून डास उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करावी लागतात.
मात्र, धारावी परिसरातील घरांमध्ये प्रवेश मिळणे देखील कीटक नियंत्रण खात्याच्या कर्मचा-यांना कठीण व्हायचे.त्यामुळे प्रभावी डास नियंत्रणासाठी २४ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान 'कोंबिंग ऑपरेशन' सुरु करण्यात आले असून यासाठी ५२ कर्मचा-यांच्या साधारणपणे ९ चमू गठीत करण्यात आल्या आहेत. या चमू मध्ये कनिष्ठ अवेक्षक(जे.ओ.) किंवा मुकादम यासारख्या १२ वरिष्ठ कर्मचा-यांच्या आणि ४० कामगारांचाही समावेश आहे. प्रत्येक चमूत ३ ते ५ सदस्य असून ते धारावीतील घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधून नागरिकांना डास नियंत्रणाचे महत्त्व पटवून देत आहेत. त्यांनतर घरातील सदस्यांसमवेत घरातील कानाकोपरा धुंडाळत त्यांना डास उत्पत्तीस्थळे कशी शोधावीत व ही स्थळे तयार होऊ नये, यासाठी काय करावे, याचेही मार्गदर्शन करित आहेत.
यानुसार 'कोंबिंग ऑपरेशन'च्या पहिल्याच दिवशी ३ हजार ३५४ घरांच्या पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान ३ हजार ५८४ एवढ्या संख्येतील डासांची संभाव्य उत्पत्तीस्थळे तपासण्यात आली. यापैकी ६५ ठिकाणी डेंगी पसरविणा-या 'एडिस' डासांची उत्पत्ती आढळून आली. तर एका ठिकाणी हिवतापास कारणीभूत ठरणा-या'ऍनाफिलीस' डासांची उत्पत्ती आढळून आली. ही उत्पत्तीस्थळे प्रामुख्याने पाण्याचे ड्रम, 'बॉक्स ग्रील'मधील अडगळीच्या वस्तू, ताडपत्री, पन्हाळी, टायर, थर्माकोल इत्यादींमधील साचलेल्या पाण्यात आढळून आली. ही उत्पत्तीस्थळे महापालिकेच्या पथकाद्वारे तात्काळ नष्ट करण्यात आली आहेत, अशीही माहिती नारिंग्रेकर यांनी दिली आहे.