नागपूर - मुंबई मनपा प्रभाग क्र. 86 मधील एका शाळेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करुन बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात 352 ची नोटीस व यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य सुधाकर देशमुख यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी उत्तर देताना डॉ. पाटील यांनी सांगितले, या बांधकामाबाबत दि. 31 मार्च 2018 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दि. 11 एप्रिल 2018 व दि. 3 मे 2018 रोजी पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान या बांधकामाच्या समोर व्हरांड्यात बांधकाम आढळल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई मनपा अधिनियम 1888 च्या कलम 351 अन्वये दि. 5 मे 2018 रोजी सद्य:स्थितीत मालक असणाऱ्या अभिषेक विनोद जैन यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याअनुषंगाने जैन यांनी दि. 27 जून 2018 रोजी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. तपासणीअंती नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई मनपामार्फत कळविण्यात आले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.