नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत प्रतिकुटुंब दीड लाखाच्या मर्यादेत कर्जमाफीची अट होती, मात्र आता प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानपरिषदेत व विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
देशमुख म्हणाले, कुटुंबाची थकबाकीची एकूण रक्कम दीड लाखापेक्षा जास्त असल्यास त्यांना दीड लाखावरील रक्कम आगाऊ भरल्यानंतर शासनातर्फे दीड लाख कर्जमाफीचा लाभ देण्याचा निकष होता. आता शासनाने अशा प्रकरणी कुटुंबाची अट शिथील केली असून प्रत्येक कर्जदारास दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. यामुळे कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील पती/पत्नी व मुले यांना प्रत्येकी दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या अनुषंगाने एकरकमी परतफेड योजनेत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची भरावी लागणारी रक्कम कमी होणार आहे. यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होणार आहे.