मुंबई - मध्य रेल्वेच्या आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे सँडहर्स्ट रोड ते मस्जिद दरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन हँकॉक पुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून रखडले आहे. या संदर्भात महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत येत्या आठवड्यात पुलाचे बांधकाम पुनः सुरु केले जाईल असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पलिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यानी दिली.
रेल्वेच्या आणि महापालिकेच्या हद्दीतील झोपड्यांचे पुनर्वसन, रुळांखालून जाणारी ४८ इंच व्यासाच्या जलवाहिनीचे स्थलांतर यामुळे पुलाची दुरुस्ती लटकली होती. जाधव यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयातील आपल्या दालनात याबद्दल महापालिकेच्या ई आणि डी वॉर्डचे संबंधित अधिकारी, पाणी, वाहतूक, मध्य रेल्वे आणि वाहतूक पोलीस या खात्याच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली होती. त्यात हे काम करण्यात येणाऱ्या सर्व अडचणींवर चर्चा करून येत्या सोमवार-मंगळवारपासून उभारणीच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देश महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे जाधव म्हणाले. पूल उभारणीसाठी ५१ कोटी रुपये खर्च येणार असून, पावसाळा धरून १९ महिन्यांत ही कामे होणार आहेत. पालिकेच्या हद्दीतील झोपड्या हटवल्या असताना, रेल्वेच्या हद्दीतील झोपड्या मात्र हटवल्या नसल्याने हे काम पुढे सरकत नसल्याचे लक्षात आल्यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्याशी पत्रव्यवहार करून त्या युद्धपातळीवर हटवण्याची मागणी केली होती. तरीही महाव्यवस्थापक या झोपड्या पालिकेने हटवाव्यात, असे पालिकेला सांगत असल्यामुळे पालिकेच्या आयुक्तांनी त्यांना पत्र लिहून रेल्वेच्या हद्दीतील झोपड्या त्यांनीच हटवाव्यात, असे स्पष्ट केले आहे, असे जाधव म्हणाले. खा. सावंत हे रेल्वेशी समन्वय राखून यासाठी सहकार्य करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. पुलाचे बांधकाम करताना जिजाबाई राठोड मार्ग बंद करण्यात येणार आहे.