मुंबई - मराठा आरक्षण मागणीसाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीनं २५ जुलैला मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड बंदची हाक दिली आहे. दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नवी मुंबई आणि पनवेलमध्येहीही उद्या बंद ठेवण्यात येणार आहे. बंदमुळे धान्य मार्केट, भाजीपाला मार्केट, कांदा, बटाटा, मसाला मार्केट बंद राहणार आहेत. या बंदमधून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलकांनी हा बंद शांततेत पाळावा असं आवाहन समितीनं केलं आहे. आंदोलनादरम्यान कोणतंही टोकाचं पाऊल उचललं जावू नये याची सतत काळजी घ्यावी असंही समितीनं म्हटलं आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी राज्य राखीव दल, क्यूआरटीच्या तुकड्या तैनात करण्यात येत आहेत. शिवाय मराठा क्रांती नेत्यांना शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती मुबई पोलीस दलाचे प्रवक्ते, उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली आहे.