मुंबई - मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांचे आरक्षण संपविण्याचा डाव सध्या सुरू आहे. नवा मनूवाद आणायचा आहे. हे आपल्याला हाणून पाडावे लागेल, असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिला. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दलित, मागास, गोरगरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. एकेकाळी मुंबईत पक्षाच्या नगरसेवकांची संख्या जास्त होती. खासदारही होता; पण याला उतरती कळा का लागली याचा आपण विचार केला पाहिजे. शिवसेनेसारखा पक्ष बघा, त्यांनी मतदारसंघातील वाड्या-वस्त्या, चाळी मजबूत केल्या आहेत. लोकांच्या छोट्या प्रश्नावरही ते आंदोलन करतात. आपले कार्यकर्ते नेत्यांचे आदेश मागतात. आता आदेश मागू नका. लोकांचे प्रश्न नमस्काराने सुटत नसतील, तर चमत्काराने सोडवा. मतदारसंघातील झोपड्यांमधील, चाळींमधील सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन ते सोडवा. लोक आपोआप तुमच्या पाठिशी उभे राहतील. एखाद्या गरीबाचे काम केलेत तर तो ते आजन्म विसरत नाही. नवे चेहरे पक्षासाठी हवेत; पण जुन्यांचाही आदर केला पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन काम करा. लोकांची मने जिंका मते आपोआप जिंकाल, असेही छगन भुजबळ म्हणाले.
कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे - अजित पवार
मुंबई शहराची सध्या दैना झाली आहे. पावसाळ्यात नेहमी मुंबई पाण्यात बुडते. कायदा सुव्यवस्थेचीही तीच अवस्था आहे. शिवसेनेच्या ताब्यात इतकी वर्षे मुंबईची सत्ता आहे. मात्र, कोणतीही सुधारणा झाली नाही. राज्यात आणि देशात भाजपाचे सरकार आहे.पण मुंबईला कोणी वाली नाही. चाकरमानी असोत वा झोपड्या, चाळीत राहणारा मुंबईकर, याच्या समस्या तशाच आहेत. प्रत्येक बाबतीत सरकार अपयशी ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जनतेसाठी आंदोलन करावे, असे अजित पवार या वेळी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. पक्षात ज्येष्ठ नेत्याचा सन्मान राखला गेला पाहिजे; पण नव्या चेहऱ्यांनाही सन्मान मिळाला पाहिजे. एखादा नवीन कार्यकर्ता चांगले काम करत असेल तर ज्येष्ठ नेत्यांनी त्याच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचेही असतात. पण सुनेच्या हाती कारभार आल्यानंतर तिनेही सासूसारखी वागणूक सर्वांना देऊ नये, असेही अजित पवार म्हणाले.