जोगेश्‍वरीतील नवलकर मार्केटच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2018

जोगेश्‍वरीतील नवलकर मार्केटच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा


मुंबई - गेली अनेक वर्ष रखडलेल्या जोगेश्‍वरी पूर्व येथील नवलकर मार्केटच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या मार्केटच्या पुनर्विकासातील सर्व त्रुटी दूर झाल्याने लवकर याचे टेंडर काढण्यात येणार असून पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती जोगेश्‍वरी विधानसभेचे आमदार तसेच राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली.

जोगेश्‍वरी पूर्व रेल्वे स्थानकालगतच नवलकर मार्केट आहे. या मार्केटची अतिशय दुरावस्था झाली आहे. सध्या या मार्केटमध्ये २४५ गाळेधारक आहेत. या मार्केटचा पुनर्विकास करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे या मार्केटचा पुनर्विकास करुन येथील गाळेधारकांना चांगल्या दर्जाचे तसेच विविध सोयी सुविधांना युक्त असे गाळे देण्यासाठी या विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी वेळोवेळी या मार्केटची पाहणी केली तसेच पुनर्विकासासाठी संबंधित विभागाबरोबर बैठकाही घेतल्या. गुरूवारीही या मार्केटच्या पुनर्विकासाबाबत राज्यमंत्री वायकर यांनी आपल्या शासकीय बंगल्यात बैठक घेतली. या बैठकीला नगरसेवक बाळा नर, प्रविण शिंदे, सदानंद परब, मुंबई महानगरपालिकेच्या मार्केट विभागाचे अधिकारी, एसआरएचे अधिकारी तसेच वास्तुविशारद उपस्थित होते. 

या मार्केटच्या पुनर्विकासासाठी वास्तुविशारदने तयार केलेल्या आराखड्यापैकी एक आराखडा सर्वानुमते मंजुर करण्यात आला. मार्केटच्या पुनर्विकासात अडथळे ठरणार्‍या त्रुटी जवळ जवळ दूर झाल्याने लवकरच या कामाचे टेंडर काढण्यात येईल, असेही वायकर यांनी सांगितले. या मार्केटमध्ये पार्कींग, कॅन्टींन, एक हॉल, कोल्ड स्टोअरेजची जागा, ड्रेनेज सिस्टम आदी आधुनिक अशा सुविधाही देण्यात येणार असल्याचे वायकर यांनी सांगितले. या मार्केटचे काम पुर्ण झाल्यावर रेल्वे स्थानकाजवळ होणारी वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे, त्याचबरोबर ङ्गाटकालगतचा रस्ताही मोठा होणार असून, येथील रस्ता अधिक स्वच्छ होण्यास मदत होणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS