मुंबई - कर्नाटकमधील कस्तुरबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका अतिशय दुर्मिळ रक्तगटाचा शोध लावला आहे. या रक्तगटाचे नाव पीपी किंवा पी नल फोनोटाइप असे आहे. ज्या रुग्णाचा हा रक्तगट आहे, तो रुग्ण हा रक्तगट असणारी देशातील पहिली आणि एकमेव व्यक्ती ठरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका रुग्णाला तत्काळ रक्त चढवण्याची गरज होती. कस्तुरबा हॉस्पिटलच्या रक्तपेढीत रुग्णाच्या रक्ताचा नमूना घेतला गेला. त्या रुग्णाचा रक्तगट कोणता हे पाहण्यासाठी डॉक्टरांनी नमून्याची तपासणी केली. मात्र त्यांना रक्तगट ओळखता आला नाही. डॉक्टरांनी एक-दोनदा नव्हे, तर तब्बल ८० वेळा रक्ताच्या नमून्याची तपासणी केली, तरी देखील त्याचा रक्तगट कोणता हे समजू शकले नाही. शेवटी डॉक्टरांनी रुग्णाच्या रक्ताचा नमूना आंतरराष्ट्रीय ब्लड ग्रूप रेफरन्स लॅबॉरेटरीमध्ये (IBGRL) ब्रिस्टल येथे (यूके) तपासणीसाठी पाठवले. तिथे तापसाणीत या रुग्णाच्या रक्तात पीपी फेनोटाइप सेल्स असल्याचे आढळले. मणिपाल अकादमी उच्च शिक्षणाचे प्र-कुलगुरू डॉ. पूर्णिमा बलिगा यांनी सांगितले की, भारतात असा रक्तगट सापडणे ही पहिल्यांदाच घडलेली घटना आहे. हॉस्पिटलच्या ब्लड बँक विभागाने केलेल्या कामगिरीची डॉ. बालिगा यांनी प्रशंसा केली आहे.