मुखमैथुनामुळे घशाचा कर्करोग होतो का ? - डॉ. शिशिर शेट्टी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 July 2018

मुखमैथुनामुळे घशाचा कर्करोग होतो का ? - डॉ. शिशिर शेट्टी


मुंबई - मुखमैथुन (ओरल सेक्स) हा शब्द प्रसारमाध्यमांमध्ये गाजला तो अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन व मोनिका ल्युइन्स्की यांच्या १९९८ मधील प्रकरणामुळे. त्यानंतरच्या काळात खास प्रौढांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम डिजिटल माध्यमांमधून सादर होण्यास सुरुवात झाली. चित्रपट, टीव्हीवरील मालिका यांमधून लैंगिक स्वरुपाची, त्यातही मुखमैथुनाची दृष्ये दाखविण्यात येऊ लागली. अर्थात मुखमैथुनाविषयी अनेक जणांना पुरेशी माहिती नसते. आता तर मुखमैथुनामुळे घशाचा कर्करोग होऊ शकतो, असा शास्त्रीय अहवाल अमेरिकेतील एका संस्थेने प्रसिध्द केला आहे. हा कर्करोग होण्यास मुखमैथुनाची कृती कारणीभूत नसते, तर ही कृती करीत असताना ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) हा विषाणू घशात गेल्यामुळे कर्करोग होण्याचा धोका निर्माण होतो.

भारतात डोके व मान या भागात कर्करोग होण्याचे प्रमाण भयंकर आहे. या कर्करोगांमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या भारतात जगाच्या २८ टक्के आहे, तर आग्नेय आशियाच्या तुलनेत ते प्रमाण ७१ टक्के इतके आहे. तंबाखू, सुपारी व मद्य यांच्या सेवनामुळे हे कर्करोग होतात. त्यातच आता भर पडली आहे घशाचा मध्यभाग (ओरोफारिंजिअल) आणि जीभ यांच्या कर्करोगाची. या दोन्ही कर्करोगांचे कारण असते एचपीव्ही विषाणू, जे मुखमैथुनामुळे पसरतात.

एचपीव्ही विषाणूमुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो, ही बाब आतापर्यंत सर्वांना ज्ञात होती. आता हे विषाणू घशाच्या कर्करोगासही जबाबदार असतात, हेही अनेक संशोधनांमधून सिध्द झाले आहे. ‘एचपीव्ही-१६’ हा त्यातील सहसा आढळणारा विषाणू आहे. तो पुरूष व स्त्रिया या दोघांवरही परिणाम करतो. ज्या व्यक्ती अनेक जणांशी मुखमैथुन करतात, त्यांना ‘ओरोफारिंजिअस’ कर्करोग होण्याचा धोका खूपच जास्त असतो. मुखमैथुनातून ‘एचपीव्ही’चे इन्फेक्शन झाले, तर घशाचा कर्करोग होतो, हे अनेकांना माहीत नसते. या कर्करोगाच्या प्राथमिक लक्षणांकडे साधारणतः दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्याच्यावर उपचार होऊ शकत नाहीत. ‘एचपीव्ही’ चे इन्फेक्शन झाल्याची लक्षणे कधीकधी दिसतही नाहीत. त्यामुळे त्याचे पर्यवसान अनेक वर्षांनी कर्करोगात झाल्यावरच त्याचा सुगावा लागतो. रुग्णाचे लैंगिक जीवन वा सवयी कशा आहेत, हे विचारण्याचा प्रघात नसल्याने, तसेच मुखमैथुन केल्याचे वा करीत असल्याचे कोणी डॉक्टरांना सांगत नसल्याने, हा कर्करोग झाला असल्याचे डॉक्टरांनाही लवकर समजून येत नाही व त्यामुळे त्वरीत उपचार करण्याचा मार्गही उरत नाही.

एचपीव्ही हा विषाणू शरीरातील ओलसर भागावर परिणाम करतो. एका संशोधनातून असे आढळून आले, की ६ टक्के पुरुषांच्या व १ टक्के महिलांच्या घशात कर्करोगास कारणीभूत असणारे ‘एचपीव्ही’चे इन्फेक्शन झाले होते, मात्र त्यातून प्रत्यक्ष कर्करोग झाल्याचे प्रमाण पुरुषांमध्ये हजारांत सात जणांना व महिलांमध्ये हजारांत २ जणांना इतकेच होते. ही माहिती नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे कर्करोग तज्ञ डॉ. शिशिर शेट्टी यांनी दिली.

एचपीव्ही विषाणूमुळे घशाचा कर्करोग झालेले महिन्याला १० ते १५ रूग्ण आपण पाहतो व यातील बहुसंख्य रुग्णांचे वय ४० ते ४५ वर्षे इतके असते, असेही डॉ. शेट्टी यांनी सांगितले. घसा व ओरोफारिजिअल कर्करोगाची लक्षणे ही बऱ्याचदा तंबाखू व दारू यांच्यामुळे होणाऱ्या कर्करोगाच्या लक्षणांसारखीच असतात. बरा न होणारा अल्सर किंवा जखम, अन्न चावताना तोंडात वेदना, ते गिळताना घशात वेदना, जिभेवर व तोंडात अन्यत्र पांढरे डाग, तोंडाला आतून आलेली सूज, सततचा खोकला ही या कर्करोगाची काही लक्षणे आहेत. यातील काही लक्षणे ही हवामान बदलामुळे घशाला झालेल्या साध्या जंतुसंसर्गाप्रमाणेच दिसतात. त्यामुळे अनेकदा रुग्णांची व डॉक्टरांची फसगत होते. ‘एचपीव्ही’मुळे घशाला झालेल्या कर्करोगाचे निदान त्यामुळे वेळीच होत नाही. त्या तुलनेत तंबाखूच्या सेवनामुळे झालेल्या कर्करोगाचे निदान लवकर होऊ शकते. या कर्करोगाच्या लक्षणांमध्ये, श्वासाला येणारी दुर्गंधी, आवाजातील बदल वा घोगरेपणा किंवा श्वासोच्छवासातील अडथळे यांचा समावेश होतो.

Post Bottom Ad