नवी दिल्ली - प्रधानमंत्री जन धन योजनेत जुलैअखेर महाराष्ट्रात २ कोटी २४ लाख ५७०८ बँक खाती उघडण्यात आली असून या खात्यात ४ हजार ६५३ कोटी ६९ लाख रुपयांच्या ठेवी जमा आहेत. देशात आजपर्यंत ३२ कोटीहून अधिक बँक खात्यात ८० हजार कोटीच्या ठेवी जमा झाल्या आहेत.
देशातील प्रत्येक घरात एक बँक खाते असावे या उद्देशाने ऑगस्ट २०१४ पासून प्रधानमंत्री जन धन योजना सुरू करण्यात आली. गेल्या चार वर्षात देशभरात या योजनेमुळे आर्थिक समावेशनाला चालना मिळाली असून जुलै २०१८ अखेर देशात ३२ कोटी १६ लाख ९९ हजार बँक खाती उघडण्यात आली आहेत. या बँक खात्यात आजअखेर ८० हजार ९३ कोटी रुपयांच्या ठेवी जमा करण्यात आल्या आहेत.
गेल्या ७ महिन्यात महाराष्ट्रात ७ लाख नवीन बँक खाती -
महाराष्ट्रात जानेवारी ते जुलै २०१८ या सात महिन्याच्या कालावधीत दरमहा १ लाख नवीन बँक खाती उघडण्यात आली आहेत. डिसेंबर २०१७ अखेर महाराष्ट्रात २ कोटी १७ लाख जन धन बँक खाती उघडण्यात आली होती,जुलैअखेर बँक खात्यांची संख्या २ कोटी २४ लाखाहून अधिक झाली आहे. या सात महिन्यात ६९० कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत.
ग्रामीण बँकांत १ कोटीहून अधिक बँक खाती -
ग्रामीण बँकांत १ कोटीहून अधिक बँक खाती -
महाराष्ट्रातील एकूण जनधन बँक खात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून ग्रामीण व निमशहरी बँकांमध्ये १ कोटी ८ लाख ६९ हजार २१५ बँक खाती उघडली गेली असून शहरी व महानगरातील बँकांमध्ये १ कोटी १५ लाख ७६ हजार ४९३ बँक खाती उघडली आहेत.
महाराष्ट्रात दीड कोटी 'रूपे कार्ड' चे वितरण -
देशातील २४ कोटी २० लाख लाभार्थ्यांना रुपे कार्डचे वितरण करण्यात आले असून महाराष्ट्रात जुलै २०१८ अखेर १ कोटी ५६ लाख ७४ हजार २५० रुपे कार्ड वितरित झाले आहेत, गेल्या सात महिन्यात ५ लाखाहून अधिक रूपे कार्डचे वितरण महाराष्ट्रात झाले आहे.