कोपरी कॉलनीतील किशोर नगरमध्ये राहणारी प्राची ही बेडेकर महाविद्यालयात बी.कॉम.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. तसेच शिक्षण घेत असताना प्राची नोकरीलाही जात होती. शनिवारी अकराच्या सुमारास नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी निघालेली प्राची पूर्व द्रुतगती महामार्गावरून जात असताना एलआयसी इमारतीसमोर आरोपी आकाशने प्राचीची दुचाकी थांबवून तिच्यावर चाकूहल्ला केला. रक्तबंबाळ अवस्थेत प्राचीला नागरिकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान प्राचीने प्राण सोडला. भरदिवसा पूर्व द्रुतगती महामार्गावर तरुणीवर चाकूहल्ला झाल्यामुळे ठाण्यातील वातावरण तणावग्रस्त झाले होते. गुन्हे शाखा, नौपाडा पोलीस आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. प्राचीवरील हल्ल्यानंतर नौपाडा पोलीस आणि गुन्हे शाखेसह सर्वच पोलीस आरोपीच्या मागे लागले होते.
...तर प्राची बचावली असती -
११ जून रोजी आरोपी आकाश पवारने कापूरबावडी परिसरात प्राचीला मित्रांबरोबर बोलत असताना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. प्राचीच्या कुटुंबीयांनी त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर फक्त एन.सी. नोंदवून कापूरबावडी पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले होते. मात्र आरोपी आकाशवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. प्राचीच्या हत्येनंतर रुग्णालयात हजर झालेल्या प्राचीच्या वडिलांनी पोलिसांना या प्रकरणी जबाबदार धरले. पोलिसांनी आरोपी आकाशवर ११ जून रोजीच्या घटनेसंदर्भात योग्य कारवाई केली असती तर आज माझी मुलगी जिवंत असती, असे म्हणत प्राचीच्या वडिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
ठाण्यातील एकतर्फी प्रेमातून धक्कादायक हल्ले -
- २०१५ साली ठाण्यात एकतर्फी प्रेमातून ठाणे रेल्वे स्थानकात युवतीवर ब्लेड हल्ला.
- ३ ऑक्टोबर २०१६ ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरात रविवारी भरदिवसा ३० वर्षीय विवाहितेची एकतर्फी प्रेमातून गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ४८ तासांत वागळे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने बाबू गोपाल गोगावले या २१ वर्षीय तरुणाला अटक करून हत्येचे गूढ उकलले.
- १७ मार्च २०१६ रोजी एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय कमलाकांत महेशचंद सैनी याने सोबत आणलेल्या गावठी कट्ट्यातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर बंदूक ठेऊन हल्ला केला होता.
- पासपोर्ट कार्यालयाजवळ भरदिवसा एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा खून..