नवी दिल्ली - उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना वीरमरण आले.
सोमवारी रात्रीपासूनच घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी भारतीय जवानांचा लढा सुरू होता. आज सकाळी मेजर कौस्तुभ राणेंसह मनदिपसिंग रावत,हमीरसिंग आणि विक्रमजीतसिंग हे तीन जवान शहीद झाल्याचे तर दोन दहशतवादी ठार झाल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. शहीद मेजर कौस्तुभ राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरा रोडचे राहणारे असून त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी व अडीच वर्षांचा मुलगा आहे. मेजर राणे मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते मीरा रोड परिसरात वास्तव्यास होते.