नवी दिल्ली - रेल्वेतील 'लोको पायलट' (एएलपी) व 'तंत्रज्ञ' पदाची ऑनलाईन परीक्षा अवघ्या एका आठवड्याभरावर येऊन ठेपली असताना केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी या परीक्षेसाठी ठेवलेली रिक्त जागांची संख्या २६,५०२ वरून थेट ६०,००० करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचा लाभ या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या जवळपास ४८ लाख उमेदवारांना होणार आहे.
रेल्वेने येत्या ९ ऑगस्टला 'एएलपी' व 'तंत्रज्ञ' पदाच्या २६ हजार ५०२ जागांसाठी ऑनलाईन परीक्षा आयोजित केली आहे. देशभरातील जवळपास ४७.५६ लाख उमेदवारांनी यासाठी अर्ज केलेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी गुरुवारी या परीक्षेसाठीच्या रिक्त जागा तब्बल ६० हजारांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. 'सरकारने एएलपी व तंत्रज्ञांच्या जागा जवळपास दुपटीने वाढवून ६० हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वेत नोकरीच्या अधिकाधिक संधी निर्माण होतील,' असे गोयल यांनी एका ट्विटद्वारे स्पष्ट केले. रेल्वेने प्रथम चाळणी परीक्षेसाठी गत २६ जुलै रोजी 'मॉक लिंक' सादर केली होती. परीक्षार्थींना परीक्षेच्या ४ दिवस अगोदर म्हणजे ५ तारखेपासून रेल्वेच्या संकेतस्थळावरून आपले 'ई-कॉल लेटर' डाऊनलोड करवून घेता येईल. अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा केंद्र असणाऱ्या शहरापर्यंत रेल्वेचा मोफत पास उपलब्ध करवून देण्यात येणार आहे. सामान्य उमेदवारांसाठी ही परीक्षा ६० मिनिटांची, तर अपंगांसाठी ८० मिनिटांची असेल. ७५ बहुपर्यायी प्रश्न असलेल्या या परीक्षेसाठी प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी 'तीनास एक' या प्रमाणात गुण कपात केली जाईल..