फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

१४ ऑगस्ट २०१८

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश

मुंबई - राज्य शासनामार्फत दहावी आणि बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा तत्काळ घेण्यात येते. मात्र या फेरपरीक्षेचा निकाल 15 ऑगस्टनंतर लागत असल्याने फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येत नाही. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला असून आता या विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रालयात आज शिक्षण मंत्री यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.तावडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या निर्णयाबाबतची माहिती दिली.

तावडे यावेळी म्हणाले, दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्य शासनामार्फत तत्काळ फेरपरीक्षा घेण्यात येते. ही फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येते तर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याअखेरपर्यंत येतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 15 ऑगस्टपूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया संपविणे आवश्यक आहे. मात्र यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी मिळत नव्हती, त्यामुळे राज्य शासनामार्फत याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका सादर करण्यात आली होती.

या याचिकेमध्ये फेरपरीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 31 ऑगस्ट अशी मुदत मिळावी, अशी विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची ही विनंती मान्य केल्याने आता या विद्यार्थ्यांनाही व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे. यावर्षी फेरपरीक्षेस विज्ञान शाखेतून 18 हजार 278 विद्यार्थी बसले असून आता या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS