Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मनपा शाळा पाहून अमेरिकन वाणिज्य दूत भारावले


मुंबई - ''आठ भाषिक माध्यमांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासह 'व्हर्च्युअल एज्युकेशन' सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये केला जात आहे. टॅबद्वारे शिक्षण देण्याची व्यवस्था असणा-या मनपा शाळांच्या इमारती देखील आकर्षक आहेत. एवढेच नाही, तर या शाळांमधील विद्यार्थी चांगले वाद्य वादन करतात आणि माझ्याशी इंग्रजी भाषेत चांगल्या प्रकारे संवादही साधतात; हे पाहून मी भारावून गेलो आहे", असे गौरवोद्गार अमेरिकेचे वाणिज्य दूत एडगार्ड कागन यांनी काढले. 'वरळी सी फेस मनपा शाळा' व माहिम येथील'सिटी ऑफ लॉस एंजलिस मनपा शाळा'; या बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांना भेट देतेवेळी उपस्थितांशी संवाद साधताना एडगार्ड कागन बोलत होते.

नुकत्याच संपन्न झालेल्या या भेटी प्रसंगी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, महापालिकेच्या शिक्षण खात्याचे उपायुक्त मिलिन सावंत, शिक्षणाधिकारी महेश पालकर, उपशिक्षणाधिकारी राजू तडवी या मान्यवरांसह संबंधित शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

अमेरिकेचे वाणिज्य दूत एडगार्ड डी. कागन यांनी एका पत्राद्वारे महापालिकेच्या दोन शाळांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच नूतनीकरण केलेल्या एका शाळेला भेट देण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले होते. त्यानुसार महापालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे नुकतेच सदर भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यानुसार कागन यांनी सुशोभिकरणानंतर चर्चेचा विषय ठरलेली 'वरळी सी फेस मनपा शाळा' आणि सन १९८३ मध्ये 'सिटी ऑफ लॉस एंजलिस' च्या तत्कालिन महापौरांनी दिलेल्या देणगीतून सुशोभित झालेल्या माहिम परिसरातील मनपा शाळेला भेट दिली.

तत्पुर्वी दस्तुरवाडी परिसरात महापालिकेच्या व्हर्च्युअल एज्युकेशन प्रणालीच्या स्टुडिओला कागन यांनी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह भेट देऊन तेथील अत्याधुनिक प्रणालीची त्यांनी माहिती घेतली. तसेच महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या टॅबचा होत असलेला वापर पाहून त्यांनी महापालिकेच्या शिक्षण खात्याचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर महापालिकेच्या व्हर्च्युअल एज्युकेशन स्टुडिओच्या माध्यमातून कागन यांनी महापालिकेच्या १२० शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही करतानाच विद्यार्थ्यांचे कौतुकही केले.

यानंतर कागन यांनी वरळी व माहिम येथील मनपा शाळांना भेट दिली. या दरम्यान महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांशी त्यांनी इंग्रजीतून संवाद साधला; तर पालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्याशी इंग्रजीतूनच संभाषण केले. तसेच मनपा शाळेतील संगीत विभागात विद्यार्थ्यांच्या वाद्य वादनाचाही त्यांनी आनंद घेतला व विद्यार्थ्यांच्या संगीत साधनेचे कौतुक केले. वरळी सी फेस मनपा शाळेच्या वाचनालयातील पुस्तके चाळतानाच, त्यातील काही इंग्रजी पुस्तकांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. महापालिका शाळांमधील संगणक कक्ष, विज्ञान कक्ष इत्यादींनाही त्यांनी भेटी दिल्या. भेटीअंती त्यांनी एकूणच मनपा शाळांमध्ये दिल्या जाणा-या शिक्षणाचे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचेही कौतुक केले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom