नवी दिल्ली - 'महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्चित झाली असून, जागावाटपाच्या मुद्द्यावर पक्षाध्यक्ष राहुल गांधी अंतिम निर्णय घेतील,' अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी दिली. 'शिवसेनेसोबत आघाडी करण्याची सध्या तरी कोणतीही शक्यता नाही,' असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
'काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नुकतीच आघाडीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यात राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. जागावाटपाचा तिढा निकाली काढण्यासाठी राहुल गांधी व पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील,' असे मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रात सध्या बूथ स्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तथा जनतेत पक्षाभिमुख वातावरण तयार करण्यासाठी जनसंघर्ष यात्रा काढली जात आहे. खरगे यांनी या यात्रेचा पहिला टप्पा ८ सप्टेंबर रोजी संपुष्टात आल्याचे नमूद करत दुसरा टप्पा चालू महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. 'सर्वच काँग्रेस नेते व कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. काही ठिकाणी समस्या होत्या. मात्र आता त्या सोडवण्यात आल्या आहेत. सर्वच लोक पक्षाला विजय मिळवून देण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून कामाला लागले आहेत,' असे ते म्हणाले. दरम्यान, या वेळी खरगे यांना शिवसेनेसोबत आघाडी करण्याविषयी छेडले असता त्यांनी सध्या तरी अशी कोणतीही शक्यता दिसून येत नसल्याचे स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अल्पसंख्याकांतील नवे नेतृत्व शोधण्याचा निर्णय घेतला आहे. 'हा कार्यक्रम लवकरच जिल्हा व ब्लॉक स्तरावर सुरू होणार आहे. यात काँग्रेसची विचारधारा मानणाऱ्या व आपल्या समुदायाच्या मुद्द्यांची जाण असणाऱ्या तरुणांना पक्षाशी जोडले जाईल. एनएसयूआय, युवक काँग्रेस व पक्षाशी संबंधित अन्य संघटनांतील युवकांची या कार्यक्रमांतर्गत विशेष निवड केली जाईल,'अशी माहिती काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नदीम जावेद यांनी मंगळवारी दिली.