ज्वलनशील रासायनिक पदार्थ बेकायदा साठविणाऱ्यांविरुद्ध कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 September 2018

ज्वलनशील रासायनिक पदार्थ बेकायदा साठविणाऱ्यांविरुद्ध कारवाई

मुंबई - औद्योगिक परिसरात ज्वलनशील रासायनिक पदार्थ बेकायदेशीररित्या साठवणूक करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी दिले.

तारापूर, जि. ठाणे औद्यौगिक वसाहतीतील विविध प्रश्न आणि माणगाव,जि.रायगडच्या पास्को स्टील कंपनीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पोटे-पाटील म्हणाले, तारापूर औद्योगिक क्षेत्रात अनेक रासायनिक कंपन्या आहेत. रासायनिक पाणी नदी आणि समुद्रात सोडल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मच्छिमारांकडूनही अनेक तक्रारी येत असल्याने अशा कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करावी. काही ठिकाणी जुन्या जलवाहिन्या आहेत. त्याद्वारे प्रदूषित पाणी नागरी वस्तीत येत असल्याने त्या कायमस्वरुपी बंद कराव्यात.

औद्योगिक परिसरात अंधाराचा फायदा घेऊन रासायनिक पाण्याचे टँकर नदी-नाल्यात सोडतात. त्यामुळे पाणी प्रदूषित होत आहे. असे टँकर पोलिसांच्या मदतीने पकडून त्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. औद्योगिक परिसरात जादा प्रकाश देणारे दिवे लावणे, सीसीटीव्ही लावणे, नागरिकांच्या तक्रारीवर कारवाई करणे, ज्वलनशील पदार्थ ठेवल्याच्या जागेची सुरक्षितता तपासणे आदी बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

आतापर्यंत सांडपाण्याचे योग्य नियोजन न करण्याऱ्या 16 कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली असून 18 कारखान्यांना उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तारापूर औद्योगिक वसाहतीत एकूण 1138 कारखाने आहेत. या बैठकीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी मधुकर लाड, सहायक सचिव (तांत्रिक) पी. के. मिरासे, मुख्य अभियंता सोंजे उपस्थित होते.

पॉस्टो स्टील कंपनीला नोटीस -
सांडपाणी नदीत सोडल्याने नागरिकांच्या तक्रारीवरुन माणगाव औद्योगिक परिसरात पॉस्टो स्टील लि. कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस दिल्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. हवेतील प्रदूषणामुळे या भागातील लोकांना खोकला, दमा, श्वास घेण्याबाबतचा तक्रारी वाढल्याने या कंपनीविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश पोटे-पाटील यांनी दिले. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. के. साळुंके, उप प्रादेशिक अधिकारी सागर औटी, अवर सचिव संजय संदनशिव आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते

Post Bottom Ad