
नालासोपारा - वसई पूर्वेकडील ससूनवघर येथे गुटख्याची वाहतूक व साठा करणाऱ्या गोदामावर वालीव पोलिसांनी कारवाई केली असून कोट्यवधी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वालीव पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधी सुपारी व तंबाखूजन्य पदार्थाचा अवैधसाठा ससूनवघर गावाचे नाक्यावर उभ्या असलेल्या महिंद्रा पिकअप गाडीमध्ये त्याच्याच बाजूला असलेल्या बंद गोडावूनमध्ये ठेवले होते. त्या ठिकाणी छापा टाकला असता एक महिंद्रा पिकअपमध्ये सुमारे ९ लाख रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. तसेच पिकअप गाडीच्या बाजूला असलेल्या गोडावूनमध्ये सुमारे १०० बॉक्स होते. या कारवाईत २ लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप गाडी व अंदाजे १ कोटी ९ लाख रुपये किमतीची सुगंधी सुपारी व तंबाखूजन्य माल असा एकूण १ कोटी ११ लाख रुपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी मिळून आलेली महिंद्रा पिकअप गाडी ताब्यात घेण्यात आली असून गोडावूनच्या बाहेर योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्याची खबर अन्न व औषधे प्रशासनाला दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.