करवतीने कापला गेलेला उजव्या पायाचा पंजा 'प्लास्टिक सर्जरी'द्वारे पुन्हा जोडला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

करवतीने कापला गेलेला उजव्या पायाचा पंजा 'प्लास्टिक सर्जरी'द्वारे पुन्हा जोडला

Share This

मुंबई - मुंबईमध्ये उदरनिर्वाहासाठी आलेला आणि मूळचा आसाम मधील असलेला एक २७ वर्षीय तरुण सुतारकाम करत असताना, त्याच्या उजव्या पायाचा पंजा करवतीने कापला गेला. या अपघातादरम्यान पाय व पंजा वेगळे होऊन केवळ कातडीच्या सहाय्याने लोंबकळत होते. अशा परिस्थितीत त्याला तात्काळ महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचार करुन व सलग ६ तास उवघड शस्त्रक्रिया करुन, त्या तरुणाचा तुटलेला पायाचा पंजा पुन्हा एकदा जोडला. जवळजवळ महिन्याभराच्या उपचारानंतर त्या तरुणाला नुकताच 'डिस्चार्ज' देण्यात आला असून त्याने कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचे आणि कर्मचा-यांचे आभार मानले आहेत. तर लवकरच हा तरुण स्वतःच्या पायांवर पुन्हा एकदा उभा राहील, असा विश्वास कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नर्सी कूपर सर्वसाधारण रुग्णालय" हे ९४० खाटांचे बृहन्मुंबई महापालिकेचे प्रमुख रुग्णालय जुहू विलेपार्ले (पश्चिम) परिसरात आहे. पश्चिम उपनगरामध्ये असणारे हे महापालिकेचे एक महत्त्वाचे रुग्णालय आहे. याच पश्चिम उपनगर परिसरात सुतारकाम करणा-या एका २७ वर्षीय आसामी तरुणाच्या उजव्या पायाचा पंजा करवतीने कापला गेला. त्या तरुणाच्या परिचितांनी त्याला तात्काळ महापालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या प्रकारच्या अपघाता दरम्यान पाय, हात यासारखा एखादा बाह्य अवयव तुटला असल्यास, त्याचा रक्तप्रवाह थांबतो व सदर अवयव निकामी होण्याची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरु होते. त्यामुळे अशा परिस्थितीत सदर रुग्णावर उपचार करताना प्रत्येक क्षण अत्यंत मोलाचा असतो व आवश्यक ते उपचार वेळेत होणे अतिशय गरजेचे असते.

ही बाब व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, सदर तरुणावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले. तात्काळ स्वरुपात करण्यात आलेल्या प्राथमिक उपचारानंतर व शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या तपासण्या केल्यानंतर त्याच दिवशी शस्त्रक्रिया देखील सुरु करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान कापल्या गेलेल्या रक्तवाहिन्यांचा दुसरा भाग शोधून तो जोडणे, कातडी जोडणे इत्यादी बाबी करण्यात आल्या. तसेच अपघातादरम्यान तरुणाच्या उजव्या पायाच्या घोट्याच्या हाडाचा भुगा झालेला होता. या ठिकाणी शस्त्रक्रियेदरम्यान धातूची पर्यायी पट्टी बसविण्यात आली.

महापालिकेच्या कूपर रुग्णालयातील 'प्लास्टिक सर्जन' डॉ. नितीन घाग यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली. सायंकाळी ८ वाजता सुरु झालेली ही शस्त्रक्रिया तब्बल ६ तासांनी म्हणजेच मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास संपली. कूपर रुग्णालयात या प्रकारची 'सुघटन शल्य चिकित्सा' (Plastic Surgery) पहिल्यांदाच करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया करणा-या चमूमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार ग्वालानी, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. एच. जी. आगरकर व डॉ. अमित जोशी, प्लास्टिक सर्जन डॉ. अनिष राऊत यांच्यासह रुग्णालयातील परिचारिका व संबंधितांचा समावेश होता. शस्त्रक्रियेनंतर जवळजवळ महिन्याभराच्या उपचारानंतर सदर तरुणास नुकताच'डिस्चार्ज' देण्यात आला आहे.

पायापासून जवळ-जवळ वेगळा झालेला उजव्या पायाचा पंजा 'प्लास्टिक सर्जरी'द्वारे जोडण्यासारखी अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यापूर्वी 'केईएम, नायर किंवा सायन'यासारख्या मोठ्या रुग्णालयांमध्येच होत असे. मात्र, पश्चिम उपनगरातील महापालिकेच्या कूपर रुग्णालयात काही वर्षांपूर्वी "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नर्सी कूपर सर्वसाधारण रुग्णालय" हे ९४० खाटांचे प्रमुख रुग्णालय सुरु झाल्यानंतर पश्चिम उपनगरांमधील रुग्णांना एक अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला. या पर्यायामुळेच सदर २७ वर्षीय आसामी तरुणावर करण्यात आलेले उपचार व शस्त्रक्रिया ही वेळेत करणे शक्य झाले, असेही अधिष्ठाता डॉ. शिंदे यांनी नमूद केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages