दादर रेल्वे स्थानकातील पूल १४ मेपासून रहदारीसाठी बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 May 2019

दादर रेल्वे स्थानकातील पूल १४ मेपासून रहदारीसाठी बंद


मुंबई - दादर रेल्वे स्थानकातील दक्षिणेकडील फुल मार्केटकडे जाणार पूल धोकादायक असल्याचा अहवाल आयआयटी मुंबईने दिला आहे. त्यामुळे १४ मेपासून हा पूल रहदारीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पुलाची डागडुजी करायची की नूतनीकरण याबाबत प्रशासन दोन दिवसांत निर्णय घेणार आहे.  

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाजवळचा हिमालय पादचारी पूल पडून सात जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पादचारी व वाहतुकीच्या पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच आता नेहमीच गर्दी असलेल्या दादर स्थानकातील दक्षिणेकडील फुल मार्केटकडे जाणारा रेल्वेच्या अखत्यारीत येणारा पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान मार्च महिन्यात धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरातील महत्त्वाच्या आठ पुलांची मोठी दुरुस्ती करण्यात येणार आहे. गुरुवारी (28 फेब्रुवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव पारित करण्यात आला होता. या आठ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. या पुलंच्या दुरुस्तीसाठी महापालिका सुमारे 16 कोटी 91 लाख 14 हजार 962 रुपये खर्च करणार आहे.

या पुलांची करणार दुरुस्ती - 1. महालक्ष्मी येथील रेल्वेवरील उड्डाणपूल
2. करी रोड स्टेशन उड्डाणपूल
3. शीव स्टेशन येथील रेल्वेवरील उड्डाणपूल
4. शीव (सायन) हॉस्पिटल धारावी येथील रेल्वेवरील उड्डाणपूल
5. दादर येथील रेल्वेवरील टिळक उड्डाणपूल
6. दादर फूल मार्केटजवळील पादचारी पूल
7. माहीम फाटक येथील पादचारी पूल
8. धारावी येथील दादर धारावी नाल्यावरील पादचारी पूल

Post Bottom Ad