मुंबई - दादर भवानी शंकर रोड येथे असलेल्या पोलीस वसाहतीमधील इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. या आगीत एका १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. श्रावणी चव्हाण असे या मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. आग लागली तेव्हा घर बाहेरून बंद असल्याने पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.
मुंबईतील दादर परिसरातील भवानी शंकर रोडवर सहा मजली पोलीस वसाहत आहे. सैतान चौकी पोलीस ठाणे देखील येथेच असून आजूबाजूला रहिवाशी वसाहती आहेत. सैतान चौकी पोलीस वसाहतीच्या तिसऱ्या मजल्यावर रविवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास भीषण आग लागली. रविवारच्या सुट्टीचा दिवस, त्यात दुपारची वेळ असल्याने बहुतेक जण जेवण करून झोपण्याच्या तयारीत असतानाच आग लागल्याची बातमी कळाली. अचानक लागलेल्या आगीमुळे एकच घबराट पसरली. भयभीत झालेल्या लोकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. हा वर्दळीचा परिसर असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. बघ्यांनी गर्दीनी केल्याने हाहाकार माजला. मात्र तोपर्यंत तीन घरांना आगीची झळ पोहचली. तब्बल एक तासानंतर अग्निशमन दलाने मोठया प्रयासाने आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत श्रावणी अशोक चव्हाण या १७ वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झाला. घरातील इलेक्ट्रिक वायर, एसी, फ्रीज, प्लास्टिक वस्तू, ज्वलनशील पदार्थ, लाकडी साहित्य आदी वस्तू जळून खाक झाल्या. तर तीन घरांचे मोठे नुकसान झाले. सिलेंडर स्फोट झाल्याने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून याबाबत अधिक तपास सुरू आहे, अशी मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी सांगितले. दरम्यान, श्रावणीच्या मृत्यूची बातमी समजताच सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार आग लागली तेव्हा घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. यामुळे या मुलीच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.