मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत पालिका प्रशासनाने नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत आयुक्तांनी नालेसफाई दिरंगाईचा लेखी खुलासा करावा अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी केली आहे. दरम्यान, शेलार यांनी शिवसेनेच्या आधी नालेसफाईची पाहणी करून शिवसेनेवर कुरघोडी केली असल्याची चर्चा पालिकेत आहे. शेलार यांच्या नालेसफाई पाहणी दौ-यानंतर शिवसेनेची धावपळ उडाली असून नालेसफाईवरून राजकारण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
मुंबईतील पावसापूर्वीच्या नालेसफाईच्या कामांची पाहणी गुरुवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. नाले सफाईची पाहणी पहिल्यांदा शिवसेनेकडून केली जाते. मात्र यंदा शिवसेनेच्या आधी भाजपकडून पाहणी करून शिवसेनेवर कुरघोडी केल्याची चर्चा पालिकेत होती.
वांद्रे, खार, सांताक्रुझ, अंधेरी, जुहूसह पश्चिम उपनगरातील अनेक भागात पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी गझदर बंध येथील नालेसफाई वेगाने आणि पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे असते. या ठिकाणच्या पंपिंग स्टेशनचे काम यावर्षी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र या कामात दिरंगाई झाल्यास संबंधित भागातील नागरिकांना पावसाळ्यात पाणी तुंबून त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आशीष शेलार यांनी गझदर बंध परिसरातील नॉर्थ, मेन, साऊथ, पीएनटी अशा भागातील प्रमुख नाल्यांच्या सफाईची पाहणी केली. यावेळी पालिका अधिकार्यांसह भाजप नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला आदी उपस्थित होते.
येथे अद्याप नाले गाळातच --
पीएनटी नाला बॉक्स, खार पहिला रस्ता नाला, शास्त्रीनगर नाला, कडेश्वरी नाला, रिलिफ रोड नाला, छोटी गटारे यांच्यासह गाळ काढण्यास अद्याप सुरुवातही झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही बाब चिंताजनक असल्याचे आशीष शेलार यांनी सांगितले. आचारसंहितेच्या नावाखाली कंत्राटदार कामात हलगर्जीपणा करीत असल्याचेही ते म्हणाले. नालेसफाईसाठी एक अभियान म्हणून काम हाती घेण्याच्या सूचना त्यांनी नगरसेवकांना दिल्या.