मुंबई - दक्षिण मुंबईतील ५० टक्के शाळांनी मुंबईच्या डबेवाल्यांना सुरक्षेच्या कारणास्तव विद्यार्थ्यांसाठी डबे आणून देण्यास रोखले आहे. शाळांनी तशाप्रकारच्या सूचना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दिल्या आहेत. शाळांच्या या निर्णयाबाबत पालकांमध्ये नाराजी असली तरी त्यांनी उघडपणे बोलण्यास नकार दिला असल्याचे समजते. दरम्यान शाळांच्या या निर्णयाचा मुंबई डबेवाला संघटनेने निषेध केला आहे.
शहरातील ५० टक्के शाळांनी विशेषत: कॉन्व्हेंट शाळांनी डबेवाल्यांना शाळांत डबे आणण्यास प्रवेश नाकारला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शाळा प्रशासनाचे म्हणणैे आहे. मात्र एकीकडे जंकफूडवर बंदी घातली जाते व दुसरीकडे शाळा प्रशासन घरचे तयार केलेले खाद्यपदार्थ खाण्यापासून रोखत आहे. डबेवाल्यांकडील डबे बंद करून मुलांना कँ टिनमधील खाद्यपदार्थ विकत घेण्यास भाग पाडत आहेत. या निणर्यामागे कँटिन चालवणाºया ठेकेदारांचा हात असावा. ठेकेदार हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडत असावेत, असा गंभीर आरोप मुंबई डबेवाला संघटनेचे सुभाष तळेकर व रघुनाथ मेदगे यांनी के ला आहे. पूर्वी एक लाख डबे पुरवायचो. पण आता हा आकडा २० हजारांवर घसरला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शाळेत डबेवाल्यांच्या सुविधेला कधीही प्रोत्साहन दिले नसून यामागे सुरक्षा हे महत्त्वाचे कारण आहे. डबा शाळेत येईपर्यंत त्यातील खाद्यपदार्थात काय होईल, हे सांगता येणार नाही. तसेच डबा घेऊन येणाºया व्यक्तींना शाळेच्या आवारात प्रवेश देऊन सुरक्षा नियमांचे उल्लंघन होऊ शकते. पालकांनीही या निणर्याला पाठिंबा दिला आहे. आम्ही मुलांवर कोणतीही सक्ती केलेली नाही. मुलांना घरुन डबा घेऊन येण्यास परवानगी आहे, असे काही शाळांनी स्पष्ट केले आहे.
शाळांत विद्यार्थ्यांना डबे आणून देण्यास काही शाळांनी रोखले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. पालकांनाही हा निर्णय योग्य वाटलेला नाही. मात्र शाळांच्या विरोधात जाऊन बोलण्यास ते धाडस करीत नाहीत. विद्यार्थ्यांना कॅटिनमधील पदार्थ खाणे भाग पाडले जाणार आहे. या निर्णयामागे खासगी ठेकेदारांचा हात असावा. शिक्षण खात्यांने या निर्णयाबाबत हस्तक्षेप करून परिपत्रक काढावे.- सुभाष तळेकर, अध्यक्ष, मुंबई डबेवाला संघटना