नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार, केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी जोशी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सोमवारी (२० मे) तब्बल १ तास बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय हे देखील यावेळी उपस्थित होते. ही चर्चा सामाजिक विषयांवर झाल्याचे सांगण्यात येत असले तरीही ही चर्चा पंतप्रधान पदाबाबत असावी असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.
भय्याजी जोशी यांनी सोमवारी दुपारी नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान, नितीन गडकरी आणि भय्याजी जोशी यांच्यात जवळपास १ तास चर्चा झाली. नेमक्या कोणत्या विषयासंदर्भात ही चर्चा झाली, याबाबत जरी माहिती मिळू शकलेली नसली तरीही पंतप्रधान पदाबाबत ही चर्चा झाली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचे कैलास विजयवर्गीय यांनी सांगितले आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदी देखील सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, मोहन भागवत आणि मोदींची चर्चा झाल्याचे कोणतेही वृत्त अद्याप आलेले नाही.