नवी दिल्ली - देशात सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करत असलेल्या मतदारांवर सोशल माध्यमांचा मोठा पगडा असल्याची बाब समोर आली आहे. प्रथमच मतदान करणारे जवळपास एक तृतीयांश मतदार सोशल माध्यमांवरील राजकीय संदेशामुळे प्रभावित झाल्याचा दावा एका अहवालाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जवळपास १५ कोटी नवमतदार मतदान करत आहेत. यापैकी जवळपास अध्र्याहून अधिक जणांना विविध सोशल माध्यमांद्वारे राजकीय संदेश मिळाल्याचे डिजिटल मार्केटिंग कंपनी एडीजी ऑनलाइनने आपल्या अहवालात म्हटले आहे. २०१४ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत सोशल माध्यमांवर राजकीय धुमाकूळ जास्त पाहायला मिळत आहे, असेही कंपनीने ऑनलाइन सर्वेक्षणाच्या माध्यमातून नमूद केले आहे. १५ कोटी नवमतदारांपैकी ३० टक्के मतदार सोशल माध्यमांद्वारे प्रभावित झाले आहेत. तर विविध सोशल माध्यमांवरून जवळपास ५० टक्के नवमतदारांपर्यंत राजकीय संदेश पोहोचलेला आहे. तर उर्वरित २० टक्के नवमतदार हे देशातील विकासाबाबत जागरूक आहेत, असे अहवालात म्हटले आहे. सार्वत्रिक निवडणुकीत सोशल माध्यमांचा युवकांवर चांगलाच पगडा दिसून येत आहे.
सोशल माध्यमांमुळे प्रभावित झालेले ५० टक्के मतदार हे २५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत. तर १८-२४ वयोगटातील जवळपास ४० टक्के युवक हे फेसबुक, इन्स्टाग्राम, शेअरचॅट, व्हॉट्सॲप व ट्विटर यासारख्या पाच सोशल माध्यमांद्वारे स्वत:ला राजकीय घडामोडींशी जोडून घेतात. उल्लेखनीय म्हणजे ऑनलाइन सर्वेक्षणाच्या माध्यमातून जवळपास २५ लाख जणांचा आढावा घेण्यात आला आहे..