मुंबई - विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विखे पाटील हे काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय नव्हते. तसेच, विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे दिला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या विधानसभा पक्षनेत्याच्या निवडीसाठी आज, सोमवारी पक्षाच्या आमदारांची बैठक होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून या पदासाठी आमदार वर्षा गायकवाड यांचे नाव आघाडीवर आहे, तर विदर्भातील आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावासाठी काँग्रेसमधील एक गट प्रयत्न करत आहे.
धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांची या पदासाठी निवड होण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड या दलित समाजाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससाठी अडचणी उभ्या केल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विधानसभेतील काँग्रेसच्या नेते पदासाठी दलित चेहरा देण्याची पक्षाची रणनीती आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले अशोक चव्हाण मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे 'मराठा-दलित' असे समीकरण करण्याचा काँग्रेसचा बेत आहे. दुसरीकडे विदर्भातील काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भ काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. या भागात काँग्रेसने चांगली कामगिरी केल्यास त्यांना राज्याच्या सत्तेत पोहचता येईल. परंतु, काँग्रेसमध्ये निष्ठावंताना पदे दिली जातात. वडेट्टीवार हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले असल्याने त्यांच्या नावाबाबत सहमती होत नसल्याचे सांगण्यात येते.