मुंबई - दादर क्रांतीसिंह नाना पाटील मंडईत पायाने गाजर धुतले जात असल्याचा व्हिडीओ सोमवार १२ आँगस्टला वायरल झाला होता. हा व्हीडीओ वायरल होताच मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचे लक्षात येताच याची गंभीर दखल पालिकेसह अन्न व औषध प्रशासनानेही घेतली. या मंडईतील पाच गाळे धारकांना नोटीस बजावत एका गाळे धारकाला १० हजार रुपये व अन्य चार गाळे धारकांना प्रत्येकी पाच हजार रुपये असा एकूण पाच गाळेधारकांना ३० हजार रुपयांचा दंड ठोठावल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले आहे.
दादर पश्चिम येथील क्रांतीसिंह नाना पाटील मंडईतील गाळे धारकांवर अस्वच्छता पसरवत मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याने एफडीएने आधी नोटीस बजावली आणि नंतर पालिकेने दंडात्मक कारवाई केली. या मंडईसह अन्य मंडईतील गाळे धारकांच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली होती. अस्वच्छता पसरवू नये, खाद्य पदार्थांची योग्य काळजी घेत मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळू नये, असा इशारा बैठकीत देण्यात आली. एफडीएची ही कारवाई क्रांतीसिंह नाना पाटील मंडईपर्यंतच मर्यादीत नसून मुंबईतील बहुतांश मंडईतील स्वच्छतेची पहाणी करण्यात येत आहे. तसेच मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्याविरोधात एफडीएची कारवाई सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.