‘एसटी’चे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती; १५० महिला चालकांची भरती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘एसटी’चे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती; १५० महिला चालकांची भरती

Share This
मुंबई, दि. २ : एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून ‘चालक-वाहक’ म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत १५० महिलांची निवड झाली असून ऑगस्ट महिन्यापासून त्यांचे एक वर्ष प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर या महिला सेवेत दाखल होतील. त्यामुळे एसटीचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती जाणार आहे.

सध्या एसटी महामंडळाची भरती प्रक्रिया सुरु आहे. यात महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त महिलांचा प्रतिसाद मिळावा यासाठी काही अटींमध्ये बदलही करण्यात आले आहेत. पुरुष व महिलांसाठी अवजड वाहन परवाना व तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव अशी अट यापूर्वी होती. मात्र अट शिथील करून महिलांसाठी अवजड ऐवजी हलकी वाहने चालवण्याचा एक वर्षांचा परवाना अशी अट ठेवण्यात आली. त्यानुसार महिलांनी अर्ज केले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर चालक-वाहक पदासाठी १५० महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांना अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याने त्यांना नियमानुसार एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्या सेवेत दाखल होतील. या महिला चालकांना प्रथम छोट्या अंतरावरील एसटी चालवण्याचा अनुभव दिला जाईल. त्यानंतर लांब पल्ल्याच्या मार्गावर त्यांची नियुक्ती केली जाईल.

महामंडळामार्फत आदिवासी युवतींसाठी ‘वाहन चालक प्रशिक्षण योजना’राबविण्यात येत आहे. यातून आतापर्यंत २१ आदिवासी युवतींना एसटी महामंडळामार्फत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.


महिला चालकांसाठी अबोली रंगाच्या रिक्षा -
परिवहन विभागामार्फत रिक्षा आणि टॅक्सीसाठी देण्यात येणारे परवाने मुक्त करण्यात येऊन मागील पाच वर्षात सुमारे २ लाख ४० हजार परवाने देण्यात आले. हे परवाने देताना महिलांचाही विचार करण्यात आला. महिला रिक्षाचालकांना ‘अबोली’ रंगाच्या रिक्षा देण्यात येतात. आतापर्यंत १ हजार १०८ इतक्या रिक्षा महिला चालकांना देण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे आदी शहरांमध्ये महिला चालक या रिक्षा चालविताना दिसत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages