मुंबई, दि. 21 : मुंबईतील गणेशभक्तांसाठी यंदाचा गणेशोत्सव सर्व दृष्टीने सुकर होण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना मुंबईचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या. पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात गणेशोत्सव पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुंबईतील पुलांची स्थिती, त्यावर होणारी गर्दी, जड वाहनांची वाहतूक आदीं बाबींचा आढावा घेण्यात आला.
यावेळी मुंबई उपनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे सचिव उपनगरप्रमुख विनोद घोसाळकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त एस. वीरेश प्रभू, एमएमआरसीएचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक रवी कुमार, वाहतूक सह पोलिस आयुक्त दिपाली मसिरकर, वरिष्ठ महाव्यवस्थापक दयानंद चिंचोलीकर, मुंबई महापालिकेचे अभियंता दराडे, एमएमआरडीएच्या शिवानी पाटील,जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता शा.सु. गांगुर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी श. क. बोरकर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष यशोधन वनगे आदी उपस्थित होते. मुंबईतील 29 पुलांपैकी 25 पूल महापालिकेच्या ताब्यात आहेत. काही धोकादायक पूल आहेत. गणेशोत्सव काळात होणारी गर्दी, वाहतूक व्यवस्था आदींचे नियोजन करण्याच्या सूचना देसाई यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यंदा 2797 मंडाळांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. आतापर्यंत 1770 मंडळांना परवाने दिलेले आहेत. 24 तारखेपर्यंत इतर परवाने दिले जाणार आहेत. विविध चौपट्यांवर विसर्जनासाठी 69 स्थळे निश्चित करण्यात आलेली आहेत. 32ठिकाणी कृत्रिम विसर्गज तलाव उभारले जाणार आहेत. दरम्यान गणेश आगमनाची पूर्वतयारी पूर्ण झाल्यानंतर येत्या 28 ऑगस्ट रोजी पालकमंत्री देसाई व महापौर यांच्या उपस्थितीत स्थळ पाहणी करून आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय विसर्जन मिरवणुकीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. विसर्जनासाठी समुद्रात दूरपर्यंत दिसेल अशा तऱ्हेची प्रकाश व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. गणेश दर्शनासाठी अनेक भाविक बोटीद्वारे समुद्रात येतात. किती बोटी आणि त्यात किती माणसे सोडायची याचेही नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.