
प्रामुख्याने गोकुळ व वारणा, या दोन मोठ्या कंपन्यांचे दूध उत्पादन सांगली, कोल्हापूर व सातारा या पट्ट्यात होते. या कंपन्या गावागावांतील शेतकऱ्यांकडून दूध संकलित करून त्याचा पुरवठा करतात. या कंपन्यांच्या दुधाची सर्वाधिक मागणी मुंबईतून असते. एकट्या गोकुळकडून रोज साडे सात लाख लिटरचा पुरवठा होतो. तर वारणासह अन्य काही छोट्या कंपन्या जवळपास साडे सहा लाख लिटर दुधाचा याच भागातून मुंबईला पुरवठा करतात. पण या तिन्ही जिल्ह्यांतील जवळपास प्रत्येक गाव पुराच्या वेढ्यात आहे. त्यामुळे दुधाचे संकलन पूर्णपणे थांबले आहे. कोल्हापूर-मुंबई महामार्गदेखील पाण्याखाली असल्याने संकलित झालेल्या दूधाचा या कंपन्या पुरवठा करू शकलेल्या नाहीत.