गुरुवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत शिवसेना - राष्ट्रवादीत जोरदार खडाजंगी झाली. मेट्रो-३ साठी आरे कॉलनीत कारशेड होण्याकरीता २७०० झाडे तोडण्याला शिवसेनेचा विरोध आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी झाडे तोडण्याच्या बाजूने या बैठकीत मतदान केले होते. तेव्हापासून ते शिवसेनेच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळेच वृक्षप्राधिकरणाच्या २९ ऑगस्टच्या बैठकीनंतर गुरुवारी झालेल्या बैठकीत शिवसेनेने त्यांना बोलू दिले नाहीच, शिवाय धमकी आणि शिवीगाळ केली असे कप्तान मलिक म्हणाले.
मेट्रो हा लोकहिताचा राष्ट्रीय प्रकल्प आहे. त्याला पाठिंबा देणे हा गुन्हा नव्हे, असे स्पष्ट करतानाच कप्तान मलिक म्हणाले की, शिवसेनेचे एवढे वृक्षप्रेम असेल तर १९९५ मध्ये गरिबांच्या कल्याणाच्या नावाखाली आरे कॉलनीच्या डोंगरावर शेकडो एकर जागेत लाखो वृक्षांची कत्तल करून अमर नॅन्सी यांना रॉयल पाल्म्स क्लब आणि रॉयल पाल्म्स इस्टेट इमारतींची उभारणी करू देण्यात आली. शिवाय गरिबांना खेळण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी तेथे गोल्फ खेळण्याचे मैदान देखील बनवण्यात आले. त्यावेळी हजारो-लाखो वृक्ष तोडावे लागले. विशेष म्हणजे त्यावेळी राज्यात शिवसेनेची सत्ता होती. एका व्यक्तीच्या भल्यासाठी लाखो वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्याची परवानगी देणाऱ्या शिवसेनेने मेट्रोच्या कारशेडसाठी वृक्षतोडीला विरोध करणे म्हणजे त्यांचे वृक्षप्रेम बेगडी असून लोकहिताविरोधात धोरण असल्याची टीका कप्तान मलिक यांनी केली. शिवसेना त्यावेळी वृक्षतोडीला परवानगी देऊनच थांबली नाही, तर रॉयल पाल्म्स क्लब आणि रॉयल पाल्म्स नगराचे उद्घाटनही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केल्याकडे कप्तान मलिक यांनी लक्ष वेधले. आरे कॉलनीच्या शेकडो एकर जागेवरील लाखो झाडे तोडून रॉयल पाल्म्स नावाचे नगर उभारताना आरे कॉलनीच्या नुकसानीचा विचार त्यावेळी शिवसेनेकडून का करण्यात आला नाही, असा प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केला आहे.
शिवीगाळ केलीच नाही -
गुरुवारी (१९ ऑगस्ट) वृक्ष प्राधिकरणाची बैठक ठरल्या वेळेला सुरू झाली. आम्ही पाच मिनिटे उशिरा गेलो. अध्यक्षांनी (आयुक्तांनी) विषय पुकारल्यानंतर कप्तान मलिक यांनी बोलण्याची परवानगी मागितली. त्यावेळी आम्ही `कप्तान मलिक चौर है` अशा घोषणा दिल्या. त्यावेळी झालेल्या गोंधळात अध्यक्षांनी त्यांच्यापुढे असलेला विषय मंजूर केला आणि सभा संपल्याचे जाहीर केले. शिवीगाळ केलीच नाही. आमचा मेट्रोला विरोध नाही, कारशेडलाही विरोध नाही. वृक्षतोडीला विरोध आहे. १९९५ चे प्रकरण काय आहे ते मला माहीत नाही. त्यावेळी पालिकेत कॉंग्रेसची सत्ता होती. रॉयल पाल्म्स प्रकरणात त्यांनी वृक्षतोडीला परवानगी दिली असेल.
यशवंत जाधव, सदस्य-वृक्ष प्राधिकरण समिती
बैठकीला तज्ज्ञ गैरहजर -
वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत वृक्षोडीच्या बाजूने मतदान केलेल्या तीन तज्ज्ञांपैकी दोघांनी राजीनामा दिला आहे. तिसरे सदस्य पाटणे यानी रजा टाकली होती आणि इतर दोन सदस्य गैरहजर राहिले, अशी माहिती यशवंत जाधव यांनी दिली.