पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 September 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्राच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मुंबईत तसेच औरंगाबादमध्ये जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. 

पंतप्रधान मोदी सकाळी मुंबईत येतील. त्यानंतर ते बांद्रा-कुर्ला संकुलात मेट्रोच्या १० (गायमुख ते मीरा रोड शिवाजी चौक), ११ (वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस) आणि १२ (कल्याण ते तळोजा) प्रकल्पाचे भूमिपूजन करतील. हे तीनही मेट्रो मार्ग ४२ किलोमीटरचे आहेत. त्यानंतर त्यांच्या हस्ते मेट्रोभवनचा पायाभरणी समारंभ होईल. या मेट्रोभवनमधून ३४० किलोमीटरच्या १४ मेट्रो मार्गांचे परिचालन केले जाईल. ३२ मजल्यांची ही इमारत असेल. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते कांदिवली पूर्वेतील बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन होईल. मेट्रोच्या भारतीय बनावटीच्या पहिल्या डब्याचेही उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते महा मुंबई मेट्रोच्या व्हिजन डॉक्युमेंटचेही प्रकाशन होईल. मुंबईत त्यांची बीकेसीच्या कन्व्हेंशन सेंटरमध्ये जाहीर सभाही होईल.

त्यानंतर ते औरंगाबादला रवाना होतील. तेथे ते महिलांच्या स्वयंसहाय्यिता गटांच्या राज्यस्तरीय मेळाव्याला संबोधित करतील. उमेद, या संस्थेतर्फे या मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. पंतप्रधान पुढे नागपूरलाही रवाना होणार होते. नागपूर मेट्रोच्या उद्घाटनाचाही त्यांचा कार्यक्रम होता. परंतु, या मेट्रोला अजूनही सुरक्षितता प्रमाणपत्र मिळाले नसल्याने ऐनवेळी त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याचे कळते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांनी या प्रमाणपत्राचा विषय चर्चेत आणला होता.

Post Bottom Ad