मुंबई - मुंबई महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालये यामध्ये राज्य सरकारच्या रुग्णालयात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाप्रमाणे केअर कॅम्पेनिअन प्रोग्राम सुरू करण्यात येणार आहे. भाजपचे नगरसेवक जगदीश यांनी यासंदर्भात मांडलेली ठरावाची सूचना मंजूर झाली.
उत्तम आरोग्यसेवा पुरविणे मुंबई महापालिकेचे कर्तव्य आहे. पालिकेच्या रुग्णालयात देशाच्या कानाकोऱ्यातून रुग्ण उपचारासाठी असतात. त्यामुळे पालिका रुग्णालयावर प्रचंड आर्थिक भार पडतो. परिणामी, रुग्णांवर योग्यप्रकारे उपचार करणे रुग्णालय प्रशासनाला शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णांच्या नातेवाइकांना प्रशिक्षण देऊन, रुग्णालयातील रुग्णसंख्येचा अतिरिक्त भार कमी करणे गरजेचे आहे. राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये "केअर कॅम्पेनिअन प्रोग्रॅम" अंतर्गत रुगांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होणे, रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर रुग्णांची नीट काळजी घेणे, नवजात बालक व नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलेची काळजी घेणे, त्यायोगे बालकांचा मृत्युदर कमी करणे, रुग्णालयात स्वच्छता ठेवणे, यासंबंधात रुग्णांच्या नातेवाइकांना प्रशिक्षण देण्यात येते. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, पालिका रुग्णालयातही केअर कॅम्पेनियन प्रोग्रॅम सुरू करण्याची मागणी जगदीश ओझा यांनी केली होती.