मुंबई - भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्तावाटपाचा फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नसतानाच आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी महायुतीतील इतर घटकपक्षांना चार मंत्रिपदे दिली जावीत आणि आमच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, अशी मागणी गुरुवारी केली.
रामदास आठवले म्हणाले, भाजपचे अध्यक्ष अमित शहा लवकरच मुंबईत येणार आहेत. त्यावेळी ते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होईल आणि सर्व मुद्द्यांवर तोडगा काढला जाईल. गेल्या सरकारमध्ये शिवसेनेकडे १२ मंत्रिपदे होती. आता ती वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पण यावर नक्कीच तोडगा निघेल. भाजप आणि इतर अपक्ष मिळून सध्या १२० आमदार आहेत. तर शिवसेना आणि इतर अपक्ष मिळून ६३ आमदार आहेत. याचाच अर्थ भाजपकडे शिवसेनेच्या दुप्पट आमदार आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. रामदास आठवले यांनी आपल्या पक्षातील नेत्यांची बैठक मुंबईत बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना महायुतीतील इतर घटक पक्षांना चार मंत्रिपदे देण्याची मागणी केली.