Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

खोटे गुन्हे मागे घ्या - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


मुंबई दि. ०३.. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात झालेल्या शांतीपूर्ण मोर्चा आणि आंदोलनात सहभागी अनेक आंदोलकांवर तत्कालीन भाजप सरकारकडून दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

त्याचबरोबर २०१८ साली कोरेगाव - भीमा येथे उसळलेल्या दंगलीत सामान्य नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हेही तात्काळ मागे घ्यावेत अशीही मागणी मुंडे यांनी स्वतंत्र पत्राद्वारे केली आहे.

मराठा समाजाने एकत्र येत क्रांतिकारी व ऐतिहासिक आंदोलन करत राज्यभरात ५८ मोर्चे काढून तत्कालीन भाजप सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडले; या आंदोलनादरम्यान ४४ समाजबांधवांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. परंतु तत्कालीन सरकारने आंदोलकांची मुस्कटदाबी करत अनेकांवर गुन्हे दाखल केले. हे सर्व गुन्हे मागे घ्यावेत व त्या सर्व आंदोलकांना न्याय द्यावा, आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्यांच्या कुटुंबियांना आधार व मदत देण्याबाबत तातडीने अंमलबाजवणी करावी अशी अपेक्षा मुंडे यांनी लिहिलेल्या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

०१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव - भीमा येथील वढू येथे उसळलेल्या दंगलीनंतर सुद्धा भाजपने 'चोर सोडून संन्याशाला फाशी' या उक्तीप्रमाणे सरकारने सामान्य नागरिक, सामजिक कार्यकर्ते व असंख्य बुद्धिजीवी लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे असंख्य निष्पाप लोकांचे भवितव्य अधांतरी असून विनाकारण न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. या प्रकरणात अनेक बुद्धिजीवी व सामाजिक कार्यकर्त्यांना नक्सलवादी ठरवून भाजप सरकार मोकळे झाले.

गेल्या आठवड्याभरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या महा विकास आघाडीच्या सरकारने धडाडीने निर्णय घेत 'आरे' जंगलातील वृक्षतोडीविरुद्ध आंदोलन करणाऱ्या पर्यावरण प्रेमींवर व कोकणातील 'नाणार' प्रकल्पाच्या विरुद्ध आंदोलन केलेल्या सामान्य नागरिकांवर तत्कालीन भाजप सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घेत सकारात्मक व आशावादी पाऊल उचलले आहे. त्याच धर्तीवर मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलक व कोरेगाव - भीमा दंगलीतील सर्व सामान्य नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरील गुन्हे तातडीने मागे घेऊन त्यांना दिलासा द्यावा तसेच मराठा आरक्षण आंदोलनात आहुती दिलेल्या सर्वांच्या कुटुंबियांना दिलासा व मदत द्यावी अशी आग्रही मागणी मुंडे यांनी लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom