डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिका सज्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिका सज्ज


मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सेवा - सुविधा पुरवण्यासाठी पालिका सज्ज झाली आहे. डॉ. आंबेडकरांना अभिवादनासाठी मुंबईत येणा-या अनुयायांकरि‍ता महापालिकेकडून चैत्‍यभूमी, शिवाजी पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्‍थान ‘राजगृह’ यासह आवश्यक ठिकाणी सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 

महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध नागरी सेवा - सुविधा उपलब्ध केल्या जातात. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. दरवर्षी या माहिती पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे मोफत वितरण चैत्‍यभूमी येथे करण्‍यात येते. यावर्षीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन गुरुवार ५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क येथे मुंबईच्‍या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते होणार आहे.

चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक (कुर्ला) टर्मिनस येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध असणार आहेत.

चैत्‍यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्‍मारकाला वंदन करण्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून येणा-या अनुयायांना आपत्‍कालीन परिस्थितीत तात्‍पुरत्‍या निवा-याची सोय म्‍हणून शिवाजी पार्क परिसरातील महापालिकेच्‍या ७ शाळा निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत. या शाळांमध्ये आवश्‍यक त्‍या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्‍ज ठेवण्‍यात आल्‍या आहेत. सुमारे १० हजार अनुयायांची त्यात व्‍यवस्‍था होऊ शकते, अशी माहिती सह आयुक्‍त नरेंद्र बरडे यांनी दिली.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अनुयायांना नागरी सेवा-सुविधा देण्यासाठी महापालिका सुसज्ज आहे. अनुयायांनी या सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर किशोरी किशोर पेडणेकर व पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केले आहे. 
 
सेवा - सुविधा --
-- चैत्‍यभूमी व शिवाजी पार्क येथे शामियाना व व्‍ही.आय.पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्‍यवस्‍था.
-- चैत्‍यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या ३ ठिकाणी रुग्‍णवाहिकेसहीत आरोग्‍यसेवा.
-- १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्‍या मंडपात तात्‍पुरता निवारा
-- शिवाजी पार्क मैदान व परिसरात १८ फ‍िरती शौचालये
-- रांगेत असणा-या अनुयायांसाठी ४ फ‍िरती शौचालये
-- ३८० पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या नळांची व्‍यवस्‍था.
-- रांगेत व परिसरात असणा-या अनुयायांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याचे १६ टँकर्स
-- संपूर्ण परिसरात विद्युत व्‍यवस्‍था
-- अग्निशमन दलामार्फत आवश्‍यक ती सेवा.
-- चैत्‍यभूमीलगतच्‍या चौपाटीवर सुरक्षारक्षकासहीत बोटीची संपूर्ण परिसरात व्‍यवस्‍था.
--- चैत्‍यभूमी येथील आदरांजलीचे मोठय़ा पडद्यांवर थेट प्रक्षेपण.
-- शिवाजी पार्क परिसरात ४६९ स्‍टॉल्‍स् ची रचना.
-- दादर (पश्चिम) रेल्‍वे स्‍थानकाजवळ आणि एफ/उत्तर, चैत्‍यभूमी व शिवाजी पार्क, दादर (पूर्व) स्‍वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष, माहिती कक्ष
-- ‘राजगृह’ येथे नियंत्रण आणि वैद्यकीय कक्ष.
-- स्‍काऊट गाईड हॉल येथे भिक्‍कू निवास.
--- शिवाजी पार्क मैदानात धुळीचा त्रास रोखण्‍यासाठी पायवाटांवर आच्‍छादन
-- अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीचे चैत्‍यभूमी व शिवाजी पार्क परिसर येथे निदर्शक फुगे
-- भ्रमणध्वनी चार्जिंगकरि‍ता शिवाजी पार्क मैदानातील मंडपात ३०० पॉइंट
-- फायबरचे २०० तात्‍पुरते स्‍नानगृह व ६० तात्‍पुरती शौचालये
-- इंदू मिलमागे फायबरची तात्‍पुरती ६० शौचालये व ६० स्‍नानगृह.
-- रांगेतील अनुयायांसाठी तात्‍पुरते छत असलेले १५० बाकडे.
-- शिवाजी पार्कव्‍यतिरिक्‍त वडाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व लोकमान्‍य टिळक टर्मिनस येथे तात्‍पुरत्‍या निवा-यासह फि‍रती शौचालये
-- स्‍नानगृहे व पिण्‍याचे पाणी

Post Bottom Ad