मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २६ जानेवारीला प्राणी व पक्षी दालनांचे लोकार्पण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2020

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २६ जानेवारीला प्राणी व पक्षी दालनांचे लोकार्पण


मुंबई - दिनांक २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सुमुहूर्तावर म्हणजेच येत्या रविवारी बृहन्मुंबई महापालिकेच्या 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय' येथे प्राणी व पक्ष्यांच्या वेगवेगळ्या ६ दालनांचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान लोकार्पण करण्यात येणा-या ६ दालनांमध्ये भारतात पहिल्यांदाच होत असलेले पक्ष्यांसाठीचे वैशिष्ट्यपूर्ण 'मुक्त विहार' दालन असणार आहे. सलग दोन वर्षे बांधकाम व उभारणी सुरु असलेल्या आणि सुमारे ५ मजली इमारतीच्या उंचीएवढ्या असणा-या या 'मुक्त पक्षी विहारा'त विविध प्रजातींचे सुमारे १०० पक्षी एकत्र नांदणार आहेत. तसेच या मुक्त विहारात असलेल्या पुलावरुन भ्रमंती करत पक्ष्यांना जवळून न्याहाळण्याची नागरिकांना मिळणारी संधी, हे या दालनाचे वेगळे वैशिष्ट्य ठरणार आहे. इतर ५ दालनांमध्ये नव्यानेच आगमन झालेल्या बिबट्या, अस्वल, तरस, कोल्हा, कासव यांचा समावेश आहे. हे प्राणी अधिक जवळून व चांगल्या पद्धतीने बघता यावेत, यासाठी या दालनांच्या दर्शनी भागात वैशिष्ट्पूर्ण काच बसविण्यात आल्याने सेल्फी प्रेमींना देखील प्राण्यांसोबत फोटो काढण्याचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे लुटता येणार आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय' अर्थात राणीची बाग म्हणजे मुंबईच्या पर्यटन नकाशावरील एक महत्त्वाचा मानबिंदू ! याच ठिकाणी सुमारे तीन वर्षांपूर्वी मार्च २०१७ मध्ये 'पेंग्विन'चे आगमन झाले आणि बागेत येणा-या मुंबईकरांच्या व पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. अनेकदा सुट्टीच्या दिवशी तर, गर्दीचे नियोजन करण्यासाठी पालिका सुरक्षा दलाच्या कर्मचा-यांना अधिक संख्येने पाचारण करावे लागले होते. आता याच पेंग्विनच्या पाठोपाठ देश विदेशातील १०० पक्षी जवळून न्याहाळण्याची संधी देणारे भव्यदिव्य असे 'मुक्त पक्षी विहार' दालनाचे लोकार्पण होत आहे. याचसोबत बिबट्या, अस्वल, कोल्हा, तरस, कासव यांच्यासाठीही उच्च दर्जाची पारदर्शकता असणा-या काचेच्या भिंती असणारी अत्याधुनिक दालने देखील मुंबईकरांच्या सेवेत रुजू होत आहेत.

मुक्त पक्षी विहार दालन -
भारतात पहिल्यांदाचा उभारण्यात आलेले 'मुक्त पक्षी विहार' दालन हे ४४ फुट उंचीचे असून जे साधारणपणे ५ मजली इमारती एवढ्या उंचीचे आहे, असे म्हणता येईल. तब्बल १८ हजार २३४ चौरस फुट क्षेत्रफळ असणा-या या मुक्त पक्षी विहारात देश विदेशातील वेगवेगळ्या प्रजातींचे व प्रामुख्याने पाणथळ जागांच्या जवळ राहणारे सुमारे १०० छोटे -मोठे पक्षी आहेत. ज्यामध्ये बजरीगर, क्रौंच (Crane), हॅरॉननाईट, पेलीकन, करकोचा (स्टॉर्क), सारस, मकाव यासारख्या विविध पक्ष्यांचा समावेश आहे. या मुक्त विहारामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी झाडांवरती वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीची व्यवस्था असण्यासोबतच पक्ष्यांचा घरट्यांचीही काळजी घेण्यात आली आहे. याच विहारामध्ये १६ फुट उंचीवरुन वाहणारा नयनरम्य धबधबा आणि मनोहारी ओहोळ देखील आहे. या मुक्त पक्षी विहारामधील वातावरण व सभोवताल हा पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवसाशी मिळताजुळता असेल, याची काळजी घेऊन विकसित करण्यात आला आहे.

या मुक्त पक्षी विहाराचे सगळ्यात महत्त्वाचे व आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे यात असणारा ९६ मीटर लांबीचा पादचारी पूल. वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वारे असणा-या या पुलावरुन मुक्त पक्षी विहारात निर्धारित वेळी प्रवेश करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. ज्यामुळे पक्ष्यांना अधिक जवळून न्याहाळण्याची व त्यांचे छायाचित्रण करण्याची संधी असणार आहे.

बिबटे, अस्वल, तरस, कोल्हा यांची दालने -
कर्नाटाकातील मंगलौर येथील प्राणिसंग्रहालयातून आणलेला बिबट्या व कोल्हा, म्हैसूर प्राणिसंग्रहालायातून आणलेला तरस, गुजरात मधील सुरत येथील प्राणिसंग्रहालयातून आणलेले अस्वल; मायानगरी मुंबईत नव्यानेच आलेल्या या प्राण्यांसाठी चित्रपटातील सेटही फिके वाटतील, अशी मनमोहक व भव्यदिव्य दालने उभारण्यात आली आहेत. त्या-त्या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्या अनुरुप दालने विकसित करण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, बिबट्याला झाडावर चढायला आवडते, हे लक्षात घेऊन त्याच्या दालनात मोठे-मोठे वृक्ष असतील याची काळजी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर झाडांवरुन उडी मारण्याची बिबट्याची क्षमता लक्षात घेत झाडांच्या वर सुमारे १२ फूट उंचावरती वैशिष्ट्यपूर्ण जाळी सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात आली आहे.

या दालनांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे हे प्राणिसंग्रहालयातील पारंपारीक पद्धतीचे गज असणारे पिंजरे नसून अतिशय उत्कृष्ट दर्जाची पारदर्शकता असलेल्या मजबूत काचेच्या भिंतींसह असणारी दालने. दालनांच्या दर्शनी बाजूला असणा-या या काचेच्या भिंतींमुळे दालनात असणारे प्राणी नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना थेट बघता येऊ शकतात. तर सेल्फी प्रेमींना व छायाचित्रकारांना प्राण्यांची अधिक सुस्पष्ट छायाचित्रे ह्याठिकाणी घेता येणार आहेत.

त्याचबरोबर दालनांची उभारणी करताना त्यांची वास्तुरचना ही प्राणी ज्या भागातील आहे, त्या भागातील गावांशी साधर्म्य साधणारी असेल याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच दालनामध्ये असणा-या प्राण्यांची ठळक वैशिष्ट्ये सांगणारे सचित्र माहिती फलक दालनाजवळ बसविण्यात आले आहे. बिबट्यासाठी उभारण्यात आलेल्या दालनाचे क्षेत्रफळ २८ हजार ८७९ चौरस फूट एवढे आहे. तर अस्वलासाठी २२ हजार ६२५ चौरस फूट, तरसासाठी ९ हजार ४७२ चौरस फूट आणि कोल्ह्यासाठी ७ हजार २६५ चौरस फूट आकाराचे दालन उभारण्यात आले आहे.

जमिनीवरील व पाण्यातील कासवांसाठी स्वतंत्र दालन -
ससा आणि कासवाच्या गोष्टीत धावण्याची शर्यत जिंकणा-या कासवासाठी राणीच्या बागेत स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. या दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन उपविभाग असणा-या या दालनात पाण्यातील कासव अर्थात 'टर्टल' व जमिनीवरील कासव अर्थात 'टॉरटॉईज' हे एकाच ठिकाणी बघता येणार आहेत. सुमारे १ हजार २३४ चौरस फूट एवढे क्षेत्रफळ असणा-या या दालनात पाण्यातील कासवांसाठी एक छोटे तळे विकसित करण्यात आले आहे. तर जमिनीवरील कासवांसाठी छोटी घरटीही याठिकाणी आहेत. या दालनाच्या दर्शनी भागाच्या भिंती देखील वैशिष्ट्यपूर्ण काचेच्या आहेत. ज्यामुळे बच्चे कंपनीला अधिक जवळून चालणा-या व पोहणा-या कासवांना बघता येणार आहे.

Post Bottom Ad