पालिकेच्या सुरक्षा दलातील रिक्त पदे सहा महिन्यांत भरण्याचे आश्वासन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 August 2026

पालिकेच्या सुरक्षा दलातील रिक्त पदे सहा महिन्यांत भरण्याचे आश्वासन


मुंबई JPN NEWS - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलातील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ही पदे तातडीने भरावीत, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी केली. यासंदर्भात त्यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन सुरक्षा दलातील रिक्त पदे भरण्याची विनंती केली.

महापालिकेच्या सुरक्षा दलातील एकूण ३८०० मंजूर पदांपैकी तब्बल २२६१ सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त आहेत. तसेच सहाय्यक सुरक्षा अधिकारी संवर्गातील ४८ मंजूर पदांपैकी ३८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सुरक्षा दलावरील कामाचा ताण वाढत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.

सहा महिन्यांत रिक्त पदे भरण्याचे आश्वासन - 
अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त बैठकीत सुरक्षा दलातील रिक्त शेड्युल्ड पदांची भरती पुढील सहा महिन्यांत करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने दिली.

रिक्त पदांची भरती पूर्ण होईपर्यंत सुरक्षा रक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीतील ओव्हरटाइमची मर्यादा १०० तासांवरून २०० तासांपर्यंत वाढविण्याबाबत तपासणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

मंजूर ड्युटी पॉईंट कमी न करण्याचे निर्देश - 
महापालिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंजूर करण्यात आलेले ड्युटी पॉईंट कमी करू नयेत, अशा सूचना प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांना देण्यात आल्या आहेत. तसेच सुरक्षा रक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी एमएसएफ बोर्ड सुरक्षा रक्षक तसेच क्रिस्टल सुरक्षा रक्षकांना सर्व ठिकाणी ड्युटी देण्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

पावसाळी व आपत्कालीन ड्युटीसाठी ‘फेस थंब’बाबत सूचना - 
पावसाळ्यातील तसेच आपत्कालीन बंदोबस्ताच्या ड्युटीच्या वेळी ‘फेस थंब’ची सक्ती न करता संबंधित परिपत्रकानुसार कार्यवाही करावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.

कोविड काळातील रखडलेले ₹९०० मानधन देण्याचे आदेश - 
कोविड काळात कर्तव्य बजावलेल्या सुरक्षा रक्षकांचे रखडलेले ₹९०० मानधन देण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आल्याचे संघटनेने सांगितले.

या बैठकीस उपायुक्त अजित कुमार आंबी, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर, चिटणिस हेमंत कदम आणि बाळा कर्पे उपस्थित होते.

सुरक्षा दलातील रिक्त पदांचा मुद्दा ऐरणीवर - 
महापालिकेच्या विविध कार्यालये, रुग्णालये, उद्याने आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा दलावर आहे. मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांमुळे उपलब्ध सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने रिक्त पदांची भरती तातडीने पूर्ण करण्याची मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS