शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे द्या - संजय राऊत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

१६ जानेवारी २०२०

शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे द्या - संजय राऊत


पुणे - 'छत्रपती शिवाजी महाराजांवर कुणाचीही मालकी असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचे दैवत आहेत. उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे,' या शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.

पुण्यातील जाहीर कार्यक्रमात घेण्यात आलेल्या मुलाखतीत राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राजकीय पक्षाला 'शिवसेना' हे नाव देताना छत्रपतींच्या वंशजांना विचारले होते का, अशी विचारणा उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली होती. त्यावर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. 'उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपचे माजी खासदार आहेत. सध्या विरोधी पक्षात असल्याने ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. त्यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावे लागत नाही; कोणाला सांगावे अथवा विचारावे लागत नाही,' असे राऊत म्हणाले. 'आम्ही सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आदर करतो. महाराजांचे नाव आले की आम्ही नतमस्तक होतो,'असेही राऊत म्हणाले.

छत्रपती उदयनराजे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. हा अपमान भारतीय जनता पक्ष आणि राज्यातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी स्पष्ट केले. छत्रपतींच्या प्रश्नांना उत्तर देता येत नसल्याने त्यांच्या वंशाचा पुरावा मागणे हे, उद्दामपणाचेच लक्षण आहे. 'एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी सांगायची आणि दुसरीकडे त्यांच्या वंशजांबद्दल अशी खालच्या दर्जाची टिप्पणी करायची हा प्रकार शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी दाखवणारा आहे. शिवसेनेला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून, या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे. शिवसेना या उद्दाम सवालाशी सहमत आहे का, हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे आणि राऊत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.

Comments

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages