रश्‍मी ठाकरे यांच्‍या हस्‍ते ‘माविम’च्या 'सावली' वसतिगृहाचे उद्घाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 January 2020

रश्‍मी ठाकरे यांच्‍या हस्‍ते ‘माविम’च्या 'सावली' वसतिगृहाचे उद्घाटन


मुंबई, दि. 4 : क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या जयंतीचे औचित्‍य साधून 'सावली' वर्किंग वुमन हॉस्टेलचे उद्घाटन मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रश्‍मी उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते झाले.

उद्घाटनप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, दोन शतकांपूर्वी जीवन संपविणाऱ्या महिलांना सावित्रीबाई फुले यांनी जीवदान दिले. सावली वसतिगृह हे महिलांचे माहेर असेल. महिलांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि सन्मान यासाठी सावली वसतिगृह परिपूर्ण आहे असा विश्वास डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यात होणाऱ्या महिला वसतिगृहासाठी सहकार्य आणि पाठिंबा असेल असे आश्वासन त्यांनी दिले. 'माविम'ने पुढील काळात करावयाच्या कामांचा आराखडा तयार करण्याचा सूचना डॉ. गोऱ्हे यांना दिल्या. ठाकरे यांचे सावली वसतिगृहासाठी नेहमीच सहकार्य राहील. त्यांचा अभ्यास आणि मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

'माविम'ने महिलांसाठी असे वसतिगृह मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी करावे, अशी सूचना खासदार गजानन किर्तीकर यांनी यावेळी मांडली.

सावली वर्किंग वुमन हॉस्‍टेल आवश्‍यक सुविधांनी सुसज्‍ज असून यामध्‍ये 36 महिलांची राहण्‍याची व्‍यवस्‍था आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांना सुरक्षित व माफक दरात मुंबईमध्‍ये राहण्‍याची व्‍यवस्‍था व्‍हावी हा या हॉस्‍टेलचा मूळ उद्देश आहे. ‘माविम’च्या माध्यमातून इतर जिल्ह्यातदेखील अशी वसतिगृहे उभारण्याचा मानस असल्याचे ‘माविम’च्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी सांगितले.

सावली वर्किंग वुमन हॉस्‍टेल इमारतीमध्‍ये तळमजल्‍यावर माविम स्‍थापित बचतगटातील महिलांच्‍या उत्‍पादित वस्‍तूंना बाजारपेठ मिळावी याकरीता भविष्‍यात व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असून पहिल्‍या मजल्‍यावर ट्रेनिंग सेंटरचीही व्‍यवस्‍था होणार आहे. राज्‍यभरातून ‘माविम’ स्‍थापित बचत गटातील मुंबईत नोकरी करणाऱ्या महिलांना येथे प्राधान्‍य देण्‍यात येईल असे ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा यांनी सांगितले.

यावेळी मुंबई महानगरपालिका महापौर किशोरी पेडणेकर यांची विशेष उपस्थिती होती. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता राहुल वसईकर यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

Post Bottom Ad