वाडिया रुग्णालय वाचवण्यासाठी कर्मचा-यांचे धरणे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 January 2020

वाडिया रुग्णालय वाचवण्यासाठी कर्मचा-यांचे धरणे आंदोलन



मुंबई -- लहान मुलांसाठी प्रसिध्द असलेले परळ येथील वाडिया रुग्णालय सद्या निधी अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. हे रुग्णालय बंद होऊ नये यासाठी कर्मचारी संघटनांसह राजकीय पक्षही सरसावले आहेत. सोमवारी रुग्णालयामधील कर्मचारी व लालबावटा कामगार युनियनने वाडिया समोर धरणे आंदोलन केले. लालबावटा युनियनचे प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मनसेच्या शर्मिला ठाकरे, जेष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सहभाग घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

परळ येथील वाडीया रुग्णालय हे लहान मुलांसाठी व प्रसुतीसाठी प्रसिध्द आहे. मुंबई महापालिकेकडून मिळणारा कोट्यवधीचा निधी थकीत आहे. त्यामुळे निधी अभावी हे रुग्णालय चालवायचे कसे असा प्रश्न रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला पडला आहे. निधी अभावी रुग्णालयातील औषधांचा साठाही संपत आला आहे. तसेच कर्मचा-यांचा पगारही देणे कठीण झाले आहे. निधी नसल्याने नवीन रुग्णांना दाखल करून घेतल्यास त्यांना सुविधा देणे शक्य नाही. त्यामुळे नवीन रुग्ण घेता येणार नाही व जुन्या रुग्णांनाही हळहळू डिस्चार्ज देण्याची भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालय वाचवण्यासाठी सोमवारी लाल बावटा कामगार युनियनचे अध्यक्ष मधुकर परब व जनरल सेक्रेटरी प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन कर्मचा-यांनी धरणे आंदोलन केले. या मनसेनेही सहभाग घेतला. रुग्णालय बंद होऊ देणार नाही, असा इशारा शर्मिला ठाकरे यांनी दिला. तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका कर्मचारी युनियनने घेतला आहे. सन २०१० च्या जीआरनुसार पालिकेने प्रसूती वाडिया रुग्णालयाला ३१.४४ कोटी रुपये तर बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयाला १०५ कोटी असे १३७ कोटी रुपये थकीत असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. कोट्यवधी रुपये थकीत असल्याने कर्मचा-यांचा पगारही थकला आहे. निधी नसल्याने रुग्णांना सुविधा कशा देणार हा प्रश्न रुग्णालय व्यवस्थापनासमोर आहे. सद्या हे रुग्णालय व्हेंटिलेटवर असल्याने ते वाचवण्यासाठी कर्मचा-यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मुंबई महापालिका व सरकारने पुढाकार घेऊन रुग्णालय वाचवावे, अशी मागणीही कर्मचा-यांच्या युनियनने केली आहे.
महाराष्ट्र शासन व मुंबई महापालिकेने रुग्णालयाचे अनुदान थकवून ठेवल्याने हॉस्पिटलमधील कर्मचारी व रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महापालिका व राज्य शासनाने अनुदान दिलेले नाही, हे कारण सांगून वाडिया व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नाही. तसेच निवृत्ती कामगारांचे पेन्शन बंद केले आहेत. या कृत्याला युनियने तीव्र विरोध केला असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सदर बाबतीत त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणीही युनियनने केली आहे. महापालिका व राज्यशासनाने रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर काही आक्षेप घेऊन निधी रोखून धरला आहे त्याबद्दल शासनाने समिती नेमली आहे. याला जास्त कालावधी जात असून मुंबईतील कामगार, कष्टकरी जनतेच्या रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वाडिया बंद होऊ देणार नाही -
"वाडिया रुग्णालय बंद झालं तर गोरगरिबांनी उपचारासाठी जायचं कुठे? महापालिका आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन यावर तोडगा काढावा. काहीही झाले तरी हे रुग्णालय आम्ही बंद होऊ देणार नाही."
शर्मिला राज ठाकरे -

वाडिया ट्रस्टचे रुग्णालय गेले ९० वर्ष सुरु आहे. लहान मुलांसाठी आणि प्रसूतीसाठी हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. या रुग्णालयाला पालिकेकडून अनुदान दिले जाते. पालिकेने रुग्णालयाला १३७ कोटी रुपयांचे अनुदान दिलेले नाही. यामुळे रुग्ण सेवा आणि कर्मचाऱ्यांचे पगार यावर परिणाम झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. तर पालिका थकीत अनुदान एका आठवड्यात देईल. मात्र रुग्णालयाचा अनागोंदी कारभार, बेकायदेशीर केलेली भरती, रुग्णांना स्वस्त औषधे न देणे याची चौकशी होई पर्यंत १० टक्के रक्कम पालिका राखून ठेवेल, असे पालिकेचे आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS