टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेनची संख्या वाढवा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 February 2020

टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेनची संख्या वाढवा


मुंबई, दि. 20 : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग, ठाणे, दहीसर, ऐरोली, वाशी येथील टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेन वाढवाव्यात, असे निर्देश देतानाच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ‍(‍एमएसआरडीसी)‌ राज्यातील सर्व उड्डाणपुलांचा आढावा घेऊन त्यांच्या सुशोभीकरणात एकसुत्रता असावी, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

एमएसआरडीसीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी मंत्री शिंदे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के आदी उपस्थित होते.

यावेळी महामंडळामार्फत विकसित करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा मंत्री श्री. शिंदे यांनी घेतला. रस्ते, पूल, उड्डाणपुल तयार करताना त्यांच्या सौंदर्यावर अधिक भर द्यावा. रस्त्यांच्या दुभाजकांवर झाडे लावावीत, शोभीवंत कुंड्या ठेवून त्यांची निगा राखावी. राज्यभरात महामंडळाच्या माध्यमातून जे उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत त्यांचा आढावा घेण्यात यावा. या पुलांची रंगरंगोटी, सौंदर्यीकरणावर भर देताना त्यात एकसुत्रता असावी. यासाठी अधिकारी नेमून त्याचा पाठपुरावा करण्यात यावा. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत. खड्डे पडणार नाही याची दक्षताही घ्यावी, असे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी सांगितले. उड्डाणपुलाखाली डेब्रिज, सामान राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पुलांखालचा भाग स्वच्छ आणि मोकळा राहावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

रस्त्यांच्या कामांमुळे राज्याच्या विकासात भर पडत असून नागरिकांची मोठी सोय होत आहे. मात्र टोल नाक्यांवर वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा दिसून येतात. नागरिकांना टोल देण्यासाठी तास-तासभर अडकून पडण्याची गरज नसल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. टोल नाक्यांवरील ही गर्दी कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा. लेनची संख्या वाढवा. हॅण्डहेल्ड मशीनधारकांची संख्या वाढवावी. विशेषत: सुटीच्या दिवशी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग, दहीसर, वाशी या टोलनाक्यांवर मोठी गर्दी होते, असेही त्यांनी सांगितले.

कल्याण-शीळफाटा रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करा. रस्त्यांवर माती, डेब्रीज काढून टाका व रस्ते स्वच्छ आणि सुंदर करा. रस्त्यांच्या दुभाजकांवर असेल्या कुंड्यांना रंगरंगोटी करा असे निर्देशही शिंदे यांनी केले. पावसाळ्यामध्ये पुलांवर खड्डे पडतात त्यामुळे अपघात होऊ शकतात. अशा पुलांची तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.

Post Bottom Ad