मुंबई महानगरपालिकेत ५ दिवसांचा आठवडा सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 March 2020

मुंबई महानगरपालिकेत ५ दिवसांचा आठवडा सुरू


मुंबई - राज्य सरकारच्या धर्तीवर आजपासून मुंबई महानगरपालिकेत पाच दिवसांचा आठवडा सुरू झाला आहे. सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन कामाची वेळ सकाळी १० ते ६ अशी राहणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता पालिका कर्मचाऱ्यांना यापुढे शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस साप्ताहिक सुट्टी लागू झाली आहे. या आधी ठाणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला आहे.

राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसाचा आठवडा केला जावा, ही मागणी मान्य करत राज्य सरकारने २४ फेब्रुवारी २०२० ला शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्याची अंमलबजावणी २९ फेब्रुवारीपासून सुरू केली. त्यामुळे सरकारी कार्यालये शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बंद राहणार आहेत. याच धर्तीवर मुंबई महापालिकेत प्रशासकीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, अशी मागणी पालिका कर्मचारी संघटनांनी केली होती. त्याला पालिका प्रशासनाने आज मान्यता दिली असून पालिकेच्या कामगार विभागाने तसे परिपत्रक जारी केले आहे.

१) मुंबई महानगरपालिकेत सध्या कामाची वेळ कामाची वेळ १०.३० ते ५.३० अशी आहे. मात्र, आता कर्मचारी, अधिकाऱ्यांना सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत काम करावे लागणार आहे.
२) नवी वेळ लागू झाल्यामुळे कामकाज आता ७ तासांऐवजी ८ तासांचे होणार आहे.
३) पालिकेत ड वर्गात काम करणारे शिपाई, हमाल, कामगार यांच्यासाठी सकाळी ९.३० ते ६.३०पर्यंत काम करावे लागणार आहे. दुपारी १ ते २ या वेळेतील केवळ अर्धा तास जेवणाची सुट्टी मिळणार आहे.
४) पालिकेच्या प्रशासकीय कार्यालयात काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी मिळत होती. त्या कर्मचाऱ्यांनाच ५ दिवसांचा आठवडा लागू होणार आहे.
५) कर्मचाऱ्यांना एका महिन्यात केवळ दोन वेळा १० मिनिटे उशिरा येण्याची मुभा आहे. त्यानंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार, कारवाई केली जाईल.
६) अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांना ५ दिवसांच्या आठवड्याचा फायदा मिळणार नाही.

Post Bottom Ad