तारापूर नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरु करण्यास 20 मार्च पर्यंत मुदत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 March 2020

तारापूर नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरु करण्यास 20 मार्च पर्यंत मुदत


मुंबई, दि.9 : तारापूर येथील नवीन सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र येत्या 20 मार्च 2020 पर्यंत सुरु करा, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. तारापूर येथील प्रती दिन 25 दशलक्ष लिटर क्षमतेच्या सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये आवश्यक दर्जा राखला जात नसल्याने तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचे उल्लंघन होत असल्याने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने 6 मार्च 2020 रोजी सदरचे सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याचे आदेश दिले होते. हे प्रक्रिया केंद्र बंद झाले असते तर सुमारे 600 उद्योगांना त्याचा फटका बसला असता तसेच हजारो कामगारांवर बेरोजगाराची वेळ येऊ शकली असती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्योगमंत्री देसाई यांनी आज मंत्रालयात या प्रश्नी तातडीची बैठक बोलाविली होती. त्यावेळी देसाई यांनी नवीन सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र येत्या 20 मार्च 2020 पर्यंत सुरु करण्याचे निर्देश दिले. उद्योजकांनी विहित मुदतीत सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरु करण्यास हयगय केल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देशही उद्योगमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

20 मार्च 2020 पर्यंत प्रतिदिन 50 दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्याचे उद्योजकांनी यावेळी मान्य केले. सदर सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर जुन्या सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावरचा भार मोठ्या प्रमाणात कमी होऊन जुने प्रक्रिया केंद्र ओसंडून वाहण्याची प्रक्रिया थांबेल तसेच नवीन केंद्रातील सांडपाणी देखील चांगल्या दर्जाचे बाहेर पडून प्रदुषणाचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी.वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अन्बलगन, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई.रविंद्रन तसेच तारापूर इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे प्रतिनिधी अशोक सराफ, प्रशांत अगरवाल, पवन पोद्दार, गजानन जाधव, डी. के. राऊत, राम पेठे आदि उपस्थित होते.

Post Bottom Ad