मुंबईत आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या १६ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या १६

Share This

मुंबई - जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्र आणि मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज कोरोनाची लागण झालेला आणखी एक नवा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे महामुंबईत कोरोना रुग्णांची संख्या एकूण १६ झाली आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने १५ रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात मुंबईत ७ व मुंबईबाहेरच्या ८ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. या रुग्णाला वेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाच्या उपअधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली. 

देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढते आहे. मंगळवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एकाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी आणखी एक नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ही रुग्ण ६८ वयाची महिला असून अमेरिकेतून आलेल्या व दोन दिवसांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयाच्या तपासणीत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या निकटची नातेवाईक आहे. सदर महिलेने आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही मात्र परदेशातून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात होत्या. त्यामुळे या महिलेलाही कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी करण्यात आलेल्या तपासणीत त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. त्यामुळे मुंबईत कोरोना लागण झालेले रुग्ण ७ व मुंबईबाहेरील ८ रुग्ण झाले असून महामुंबतील एकूण संख्या १५ वर पोहचली आहे, अशी माहिती डॉ. दक्षा शाह यांनी दिली. दरम्य़ान, बुधवारी ५११ रुग्ण तपासणीसाठी आले. यातील ७४ संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचारासाठी दाखल व्हा --
परदेशातून येणारी व्यक्ती व त्यांचे निकट असलेल्या व्यक्ती अशा दोन प्रकारातून सध्या भारतात कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे जे परदेशातून प्रवास करून मुंबईत आले आहेत त्यांनी व त्यांच्या निकट असलेल्या व्यक्तींनी घरातच एका वेगळ्या खोलीत १४ दिवस थांबावे. मधुमेह, रक्तदाब तसेच गरोदर महिलापासून लांब राहावे. १४ दिवसांत किंवा नंतर सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे डॉ. शाह यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages