भंडारा रुग्णालय आग, 10 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

०९ जानेवारी २०२१

भंडारा रुग्णालय आग, 10 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू



भंडारा - जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या विशेष दक्षता विभागाला ( SNCU ) लागलेल्या आगीत 10 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, सात बालकांना वाचवण्यात यश आलं आहे.

शनिवारच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. रात्रीच्या वेळी रुग्णालयातील आऊट बाॅर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दरवाजा उघडून पाहिले असता त्या कक्षात मोठ्या प्रमाणात धूर होता. तिनं लगेचच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. प्रशासनानं तातडीनं हालचाल करून अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जिथं आग लागली होती, त्या विभागात आउटबॉर्न आणि इन बाॅर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचले. तर, आऊट बाॅर्न युनिटमधील दहा मुलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयात प्रचंड गोंधळ झाला. मृत बालकांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. त्यांच्या दु:खाला पारावार उरला नव्हता. या सगळ्यांना आवरणे कठीण झाले होते. आगीच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तात्काळ रुग्णालयात धाव घेतली व संपूर्ण घटनेची माहिती घेतली. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचं सांगण्यात येत असून या प्रकरणी अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री ठाकरेकडून तीव्र दु:ख व्यक्त; संपूर्ण घटनेची तत्काळ चौकशीचे आदेश -
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

पालकांना ५ लाखांची मदत जाहीर -
भंडारा रुग्णालय आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मृत नवजात बालकांच्या पालकांना ५ लाखांची मदत जाहीर, राज्य सरकारच्या वतीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही मदत जाहीर केली आहे.

भंडारामध्ये घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी - पंतप्रधान मोदी
भंडारामध्ये घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आणि त्रासदायक आहे. आपण अनमोल लहान जीव गमावले असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी भंडारा घटनेबद्दल व्यक्त केले दु:ख -
भंडारा येथील शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. हे दु:ख व्यक्त करणे शब्दांच्या पलीकडे आहे. या दुर्दैवी घटनेचे दु:ख सहन करण्याची देव त्यांना शक्ती देवो, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केले.

भंडाऱ्याची घटना अत्यंत्य दुर्दैवी; सरकारने पीडित कुटुंबीयांना सर्वोतपरी मदत करावी - राहुल गांधी
महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत जीव गमावलेल्या मुलांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन राज्य सरकारला करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटने बद्दल दु:ख व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS