मुंबई-०९-(प्रतिनिधी) - भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून सुमारे १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची , मनाला विदीर्ण करून हेलावून टाकणारी अत्यंत दुख:द, दुर्दैवी,वेदनादायी, मन सुन्न करणारी अशी निशब्द करणारी दुर्घटना घडली असून ,ह्या सगळ्या दुर्दुवी घटनेला कारणीभूत असणाऱ्या सर्वांवरच अतिशय कठोरपणे कारवाई करून त्यांना ह्या मृत्यूचे आरोपी मानून त्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा फायर ऑडीट नसणा-या राज्यातील सर्व रूण्णालयांचे परवाने त्वरीत रद्द करण्यात यावेत, अशी मागणी भीम आर्मीचे राज्यप्रभारी .दत्तूभाई मेढे आणि महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी प्रमुख राजूभाई झनके यांनी केल्याची माहिती राजेश गवळी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घोषणेनुसार राज्य शासनाने ह्या जिवीतहानीची गंभीरपणे दखल घेऊन ह्या जळीतकांडाच्या सखोल चौकशीचे आदेश देताना अश्याप्रकारच्या दुर्दैवी घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ह्या घोषणेचे भीम आर्मीच्या वतीने स्वागत करीत असतानाच आम्ही ह्यावर समाधानी नसून सरकारने तात्काळ शासकीय सह सर्वच खाजगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे तसेच ज्या खाजगी रुग्णालयांचे फायर ऑडिट नसेल अश्या सर्व खाजगी रुग्णालयांचे परवाने रद्द करण्यात यावे ,अशी मागणी भीम आर्मीने सरकारकडे केली आहे.
तसेच कोरोनाच्या संकटकाळात घडलेल्या या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील आरोग्य विभागाचे शासकीय रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व खाजगी रुग्णालय निकषानुसार प्रशस्त, स्वच्छ,अद्यावत,सर्व स्वतंत्र विभागात सर्व प्रकारच्या आरोग्य सोयी सुविधांनी सुसज्ज करण्याची मागणी सुद्धा भीम आर्मीने पत्रकाद्वारे राज्य शासनाला केली आहे.
No comments:
Post a Comment